गुन्हेगारी कार्यक्रम पाहून केली चोरी, कॅशिअरला अटक

छोट्या पडद्यावर गुह्याबाबत असलेला कार्यक्रम पाहून चोरी करणाऱ्या कॅशिअरला अखेर खार पोलिसांनी अटक केली. शहावाज शेख असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. खार पूर्व परिसरात एक हॉटेल आहे. तीन दिवसांपूर्वी सकाळी चोरीचा प्रकार उघड झाला. सकाळी एक कर्मचारी कामाला आला. त्याला कॅश लॉकर आणि बॉक्स गायब दिसला. घडल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकाने खार पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. त्या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्या कॅमेऱ्यामध्ये पहाटे एकजण हुडी आणि मास्क घालून आला. हॉटेलच्या बाथरूमच्या खिडकीतून तो कॅश बॉक्स घेऊन जात असल्याचे फुटेजमध्ये कैद झाले.

पोलीस निरीक्षक वैभव काटकर यांच्या पथकातील उप निरीक्षक माणिक घोगरे आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी खार ते दादर आणि मुंब्रा परिसरातील 200 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मुंब्रा येथे तो उतरला. उतरल्यावर त्याने हुडी आणि मास्क काढला. त्यावरून तपासाची चक्रे फिरली. त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो तेथे तीन महिन्यांपासून फ्रंट ऑफिस स्टाफ म्हणून काम करत होता. त्याने मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी पैसे हवे असल्याने चोरीचे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे.

अशी सुचली कल्पना

शेखला पैशाची गरज होती. त्याने मनी मनी हेईस्ट ही स्पॅनिश चोरीची कथा पाहिली. त्या कथेमध्ये दरोडेखोर हे मास्क आणि हुडी घालून चोरीचे कृत्य करत असल्याचे पाहिले. तो सिन पाहिल्यावर त्याने तशा पद्धतीने चोरी करण्याचे ठरवले.