मी शौचालय वापरतो, उमेदवाराला द्यावे लागणार शपथपत्र!

महापालिका निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरताना उमेवाराला, ‘मी शौचालय वापरतो’, अशा आशयाचे शपथपत्र द्यावे लागणार आहे.

मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 29 पालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. 31 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे, तर 2 जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. 3 जानेवारी रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र उमेदवारांना सामाजिक स्वास्थ्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने शपथपत्र लिहून द्यावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत द्यावे लागणार आहे.

स्वच्छ भारत योजनेंतर्गत अट

केंद्राच्या स्वच्छ भारत योजनेंतर्गत गाव, शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली. उघडय़ावर शौचाला जाण्यास आळा बसावा या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये स्वतःचे घर असले तरी किंवा भाडय़ाच्या घरात राहत असले तरी आणि शौचालय असले तरी हे शपथपत्र देणे बंधनकारक राहणार आहे.