
‘महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ असलेल्या ‘लालपरी’वर अन्यायाचे सत्र सुरू असतानाच आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ‘जय महाराष्ट्र’चा उल्लेख टाळला जात आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग तसेच इतर प्रमुख रस्त्यांवरील एसटीच्या प्रवासी थांब्यांवर एसटी महामंडळाचा चुकीचा ‘लोगो’ प्रदर्शित करण्यात आला आहे. महामंडळाच्या ‘लोगो’मधून ‘जय महाराष्ट्र’चा उल्लेख वगळण्यात आला आहे.
आठ वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये ‘जय महाराष्ट्र’ घोषणेवर बंदी घालण्यात आली आणि वादाला तोंड फुटले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटकच्या एसटी बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून तेथील सरकारच्या द्वेषाचा निषेध केला होता. त्याच पार्श्वभूमीवर एसटी बसगाडय़ांवर तसेच एसटी महामंडळाच्या लोगोमध्ये अभिमानाने ‘जय महाराष्ट्र’ लिहिले जाईल, अशी घोषणा तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. त्यानुसार महामंडळाच्या प्रत्येक कार्यालयात, एसटी बसगाडय़ांवर, आगारांमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा उल्लेख बंधनकारक आहे. असे असताना मुंबईतील पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग येथील एसटीच्या प्रवासी थांब्यांवर ‘जय महाराष्ट्र’चा उल्लेख टाळून महामंडळाचा लोगो प्रदर्शित करण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडील नोंदीनुसार, शीव ते बोरिवलीपर्यंत पश्चिम द्रुतगती महामार्गावर एसटीचे 16 प्रवासी थांबे आहेत, तर पश्चिमेकडील स्वामी विवेकानंद मार्गावर 12 प्रवासी थांबे आहेत. त्याचबरोबर पूर्व द्रुतगती महामार्गावर एडवर्ड नगर ते कळंबोलीपर्यंत 35 प्रवासी थांबे आहेत. यातील बहुतांश थांब्यांवरील एसटी महामंडळाच्या ‘लोगो’मधून ‘जय महाराष्ट्र’ गायब आहे. त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
‘जय महाराष्ट्र’ची एसटीला अॅलर्जी का?
महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या ‘जय महाराष्ट्र’ची एसटी महामंडळाला अॅलर्जी आहे का, असा संतप्त सवाल महाराष्ट्रप्रेमींकडून विचारला जात आहे.
महाराष्ट्र अस्मितेपेक्षा जाहिरातदारांना मान!
पश्चिम द्रुतगती महामार्गावर दररोज मोठय़ा प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे महामार्गालगतच्या जाहिरातीसाठी खासगी कंपन्या अधिक पैसे मोजतात. याच व्यावसायिक मोहजालामध्ये ‘एसटी’चे प्रवासी थांब्यांवरील अस्तित्व हरवल्याचे दिसून येत आहे. एसटीचे थांबे जाहिरातदारांना आंदण देताना एसटी महामंडळाने महाराष्ट्र अस्मितेला धक्का दिल्याचे चित्र आहे.
‘जय महाराष्ट्र’ हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिबिंब आहे. 2017 मध्ये राज्याचे तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाच्या लोगोमध्ये ‘जय महाराष्ट्र’ हा सुवर्णबदल करून महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली होती. परंतु आता एसटी प्रशासनाने एसटीच्या लोगोवर शोभून दिसणारे ‘जय महाराष्ट्र’ काढून मराठी अस्मितेला ठेच पोहोचवली आहे. – हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना.





























































