कोस्टल रोडवर बेदरकार ड्रायव्हिंग करणाऱ्यांना आरटीओचा दणका, सात महिन्यांत 4 हजार चालकांना 82 लाखांचा दंड

दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडवर बेदरकार ड्रायव्हिंग करणाऱया वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि वाहतूक पोलिसांनी कारवाईचा दणका दिला आहे. मागील सात महिन्यांत कोस्टल रोडवर वेगमर्यादेचे उल्लंघन केलेल्या साडेचार हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 82 लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.

कोस्टल रोडमुळे दक्षिण मुंबईतील रस्ते प्रवास सुकर झाला आहे. मात्र या मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱयांचे आव्हान आहे. त्यांना रोखण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीस आणि आरटीओच्या पथकांमार्फत कारवाईची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमध्ये बेदरकार गाडी चालवणाऱया 4,000 हून अधिक चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यातील 1,500 जणांनी चालान भरले असून नियमभंग करणाऱयांकडून 31 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. याशिवाय आरटीओच्या पथकांनीदेखील वेगमर्यादा ओलांडणाऱया आणखी 596 वाहनचालकांना कारवाईचा दणका दिला आहे.

सुट्टीच्या दिवशी शर्यत लावणारे रडारवर

कोस्टल रोडवर विकेण्डला गाडय़ांची शर्यत लावणाऱया वाहनचालकांचे प्रमाण वाढत आहे. कोस्टल रोड वेगवान गाडय़ांसाठी जणू रेसिंग ट्रक बनला आहे. सुट्टीच्या दिवशी या मार्गावर कमी वाहतूक असते. तीच संधी साधत गाडय़ांची शर्यत लावणारे अनेक तरुण कोस्टल रोडवर हजेरी लावतात. त्यांच्यावरही कारवाई करीत असल्याचे आरटीओ अधिकाऱयांनी सांगितले.

ताडदेव-वडाळा आरटीओची चार पथके

कोस्टल रोडचा प्रवास सुरक्षित ठेवण्याकामी आरटीओने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या मार्गावर नियम मोडणाऱयांवर वॉच ठेवण्यासाठी ताडदेव व वडाळा आरटीओची चार पथके तैनात आहेत. या पथकांनी 7 महिन्यांत 596 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. कोस्टल रोडवर दरदिवशी 18 ते 20 हजार वाहनांची वर्दळ सुरू असते.