
राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांचा प्रश्न चिघळला आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये, मनोरुग्णालये आणि कामगार रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. भरपावसात झालेल्या आंदोलनाला कर्मचाऱयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राज्यातील सर्व रुग्णालये व विभागातील वर्ग ‘ड’ची रिक्त पदे सरळसेवेने तत्काळ भरून सध्या सुरू असलेले खासगीकरण रद्द करावे, केंद्रीय सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांना किमान मूळ वेतन 18 हजार मिळावे. मनोरुग्णालयातील 634 सफाईगारांची पदे पुनर्जीवित करावीत, सेवानिवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयाच्या एका पाल्यास शासनसेवेत सामावून घ्यावे अशा विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्यअध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि सरचिटणीस बाळाराम सावर्डेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेचे सुरेश आहेरकर, मार्तंड राक्षे, बाबाराम कदम, करण सोनवणे, भगवान शिंदे, रामभाऊ पांचाळ, योगिता सोनवणे आदी उपस्थित होते.
शिवसेना आंदोलकांच्या पाठीशी
यावेळी शिवसेना उपनेते, आमदार सचिन अहिर आणि आमदार आमदार मनोज जामसुतकर यांनी या आंदोलकांची भेट घेत शिवसेना तुमच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. तसेच येत्या अधिवेशनात हा विषय मांडणार असल्याच जाहीर केले. सरकारने लवकरात लवकर मागण्या पूर्ण न केल्यास बेमुदत आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार सचिन अहिर यांनी दिला. आमदार मनोज जामसुतकर यांनीही या कामगारांच्या मागण्यांवर सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगितले.