
शिवडी बीडीडी चाळींचा वर्षानुवर्षे रखडलेला पुनर्विकास मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी वारंवार विनंती करूनही मुख्यमंत्र्यांनी आजतागायत बैठकीसाठी वेळ दिलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या या वेळकाढूपणाचा रहिवाशांनी विभागात ठिकठिकाणी बॅनर लावून निषेध केला आहे. कबुतरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री बारा तासात बैठक घेतात. पण शिवडी बीडीडीवासीयांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही का, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी स्थानिक शिवसेना आमदार अजय चौधरी पाठपुरावा करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुनर्विकासाबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक लावावी, अशी विनंती अजय चौधरी यांनी वारंवार त्यांच्याकडे केली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी आजतागायत बैठकीसाठी वेळ दिलेली नाही. त्यामुळे रहिवाशांमध्ये नाराजी असून त्यांनी ठिकठिकाणी बॅनर लावत निषेध केला आहे. विशिष्ट एका समाजाकरिता कबुतरांच्या खाण्याच्या विषयाबाबत 12 तासांत बैठक लावण्यात आली. शिवडी बीडीडी रहिवाशांची परिस्थिती कबुतरांपेक्षा कमी लेखण्याचे पाप सरकार करीत आहे. सरकारला कबुतरे महत्त्वाची, पण शिवडी बीडीडी चाळीतील रहिवासी महत्त्वाचे नाहीत, अशी नाराजी रहिवाशांनी बॅनरद्वारे व्यक्त केली आहे. हे बॅनर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
n नुकतीच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय बंदर विकासमंत्री सर्वानंद सोनवाल यांची भेट घेत शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात येणाऱया अडचणी दूर करा, अशी विनंती केली होती. शिवडी बीडीडी आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील चाळींचा पुनर्विकास करून केंद्र सरकार म्हाडाप्रमाणे उत्पन्न मिळवू शकते, असेही आदित्य ठाकरे यांनी सोनवाल यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यावर सोनवाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.