
महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घातले जात असून या मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्या राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलनाचा वणवा पेटणार आहे. उद्धव ठाकरे दादरमध्ये आंदोलनात उतरणार आहेत तर राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी 12 वाजता हजारोंच्या संख्येने शिवसैनिक धडकणार आहेत. या आंदोलनात सामान्य जनताही उतरणार असून अख्खा महाराष्ट्र भ्रष्ट मंत्र्यांविरुद्ध उभा ठाकणार आहे.
मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर दुपारी 12 वाजता हे आंदोलन होणार आहे. त्या आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. त्याच वेळेला राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर उग्र आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात शिवसैनिकांसह जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे, मुजोरपणाचे आरोप झाले. विधिमंडळ सभागृहात रमी खेळणारे, सरकारला भिकारी म्हणणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हकालपट्टीऐवजी त्यांचे खाते बदलून त्यांना क्रीडामंत्री बनवले गेले. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचे काय जाते असे म्हणणारे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना साधी माफीही मागायला सांगितले गेले नाही. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या बारमध्ये बारबाला पकडल्या गेल्या तरी कदम अजूनही मंत्रीपदी कायम आहेत.
मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा होणार जाहीर पंचनामा
सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे मत्स्यविकासमंत्री नितेश राणे यांचे तोंड सरकारने बंद केलेले नाही. भरत गोगावले, जयकुमार गोरे, नरहरी झिरवळ, दादा भुसे या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होऊनही सरकार मूग गिळून गप्प आहे. कलंकित, भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई न करून सरकार महाराष्ट्र आणि येथील जनतेचा अपमान करत आहेत. त्याबद्दल सर्वसामान्य जनतेमध्येही प्रचंड संताप आहे. तो जनआक्रोश या आंदोलनातून व्यक्त होणार आहे. तमाम शिवसैनिक या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा जाहीर पंचनामा या आंदोलनात करणार आहेत.
मुंबईत कुठे आंदोलन?
स्थळ – दादर शिवतीर्थ येथील माँसाहेब
सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर
वेळ – दुपारी 12 वाजता
रमी, डान्सबार आणि पैशांनी भरलेली बॅग…
विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळणारे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता फक्त खाते बदलून त्यांना क्रीडा मंत्री करण्यात आले.
घोटाळ्याचा आरोप आणि पैशांनी भरलेल्या बॅगेसोबतचा व्हिडिओ समोर येऊनही सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना अभय.
गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या डान्सबारची पोलखोल होऊनही कोणतीच कारवाई नाही.
शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार आणि गोंधळाबाबत आरोप होऊनही या खात्याचे मंत्री दादा भुसे अजूनही मंत्रिपदावर कायम आहेत.
जयकुमार गोरे, नितेश राणे, संजय राठोड, भरत गोगावले हे मंत्री हिटलिस्टवर होते पण त्यांना हात लावण्यात आलेला नाही.
विविध खात्यांतील भ्रष्टाचार, गुंडगिरीची भाषा, समाजात तेढ वाढवणारी वक्तव्ये, महिला अत्याचाराचा आरोप झालेल्या मंत्र्यांवर कारवाईची मागणी होऊनही मुख्यमंत्री फडणवीस युतीधर्म निभावत त्यांना गोंजारत आहेत.