
करी रोड येथील ‘अविघ्न’ इमारतीला वर्षभरात दुसऱयांदा लागलेल्या आगीने अग्निशमन यंत्रणा सक्षम ठेवणे किती अनिवार्य आहे याचा चांगलाच धडा मुंबईकरांना घालून दिला आहे. गेल्या वर्षी या इमारतीच्या ‘बी’ विंगमध्येच 19 व्या मजल्यावर आग लागली होती. यावेळी अग्निशमन यंत्रणा सक्षम नसल्याने काही वेळातच आग ‘लेव्हल-3’ची म्हणजेच भीषण झाली होती. मात्र या वर्षी आग ‘लेव्हल-1’ मध्ये असताना वाढू न देता 23 व्या मजल्यावर आग पूर्णपणे विझवण्यात यश आले. पर्यायाने ‘बी’ विंगमधील सुमारे 150 फ्लॅटमध्ये राहणाऱया सुमारे 500 जणांच्या जिवाचा धोका टळला.
वेगाने औद्योगिक आणि नागरी विकास होताना बांधकामांचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे. त्यामुळे दाटीवाटीच्या वस्त्या, कार्यालये उभी राहत आहेत. या ठिकाणी दुर्दैवाने आगीची दुर्घटना घडल्यास जीवित-वित्तहानी टाळता यावी यासाठी अग्निशमन यंत्रणा सक्षम ठेवणे कायद्यानेही बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून नियमितपणे सोसायटय़ा, आस्थापनांना भेटी देऊन तपासणी करण्यात येते. यावेळी अग्निशमन यंत्रणा सक्षम नसल्यास नोटीस देण्यात येते. त्यामुळे जीवित-वित्तहानी टाळण्यासाठी सोसायटय़ा आस्थापनांनी इमारतीत अग्निशमन यंत्रणा सक्षम ठेवावी, असे आवाहन अग्निशमन दल प्रमुख संजय मांजरेकर यांनी केले आहे.
अग्निशमन दलाकडून अशी होते कार्यवाही
- उत्तुंग इमारतींना परवानगी देताना इमारतीत अग्निशमन यंत्रणा तैनात असेल तरच ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. इमारतीचे फायर ऑडिट करून अग्निशमन यंत्रणा सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र दर सहा महिन्यांनी सादर करावे लागते.
- मालक किंवा भोगवटाधारकांनी ऑडिट करून यंत्रणा सक्षम असल्याबाबत अग्निशमन दलाकडे ‘फॉर्म बी’ सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईनंतर वीज-पाणी कापण्याची कारवाई होऊ शकते.
40 सोसायटय़ांना नोटीस
दरम्यान, अग्निशमन दलाकडून अलीकडेच मुंबईभरात करण्यात आलेल्या तपासणीत अग्निशमन यंत्रणा सुरू नसलेली 92 हॉटेल्स आणि 40 व्यावसायिक इमारतींना नोटीस बजावली आहे. संबंधितांना 120 दिवसांत याबाबत कार्यवाही करावी लागणार आहे.


























































