
ओएनजीसीच्या एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंत्राटदाराच्या हव्यासापोटी 25 जणांचा मृत्यू झाला. उर्वरित अद्याप बेपत्ता आहेत. हे या कंत्राटदार कंपनीचे बेपर्वाईचे बळी असल्याने या कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप आमदार अॅड. आशीष शेलार यांनी आज केली. या प्रकरणाची चौकशी भरकटवून पीडितांना न्यायापासून वंचित ठेवण्याचे काम राज्य सरकारच्या झारीतील कोणते शुक्राचार्य करीत आहेत, असा प्रश्नही त्यांनी केला.
‘तौकते’ चक्रीवादळात भरसमुद्रात झालेल्या बार्ज दुर्घटनाप्रकरणी आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय नाविक संघाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आशीष शेलार बोलत होते.
या बार्जचे कंत्राटदार या दुर्घटनेला सर्वस्वी जबाबदार आहेत, मात्र कंपनी यातून पळ काढू पाहत असल्याने त्या कंत्राटदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. या दुर्घटनेचा दोष केवळ कॅप्टनवर टाकून या पंत्राटदार एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मालक शापूरजी-पालनजी तसेच संचालक प्रेम शिवम, अश्विनी कुमार आणि पै यांना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस का करीत आहेत? जे कप्तान अद्याप सापडलेले नाहीत ते आपली बाजू मांडू शकलेले नाहीत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कोणाला वाचवायचे आहे, असा प्रश्न शेलार यांनी केला.


























































