मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा नेहमीप्रमाणे बहिष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

युतीचा काय खेळ चाललाय, हे पाहण्यापेक्षा विरोधकांचा काय खेळ होतोय हे त्यांनी पहावं. त्यांच्यानंतर चर्चा सुरू करून शिवसेना-भाजपने युतीची घोषणाही केली. पण त्यांचं अजूनही काही ठरत नाही आहे. तेव्हा आमचं घर चांगलं चाललंय, विरोधकांनी आपलं घर पाहावं, आमच्या घरात डोकावू नये, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांना लगावला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या चहापानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी युतीचा खेळ चाललाय या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही काय खेळ करतोय, यापेक्षा विरोधकांचा काय खेळ होतोय हे त्यांनी पाहावं. आम्ही त्यांच्यानंतर चर्चा सुरू करून युती घोषितही केली. दोन महिन्यांपासून त्यांची चर्चा सुरूच आहे. अजूनपर्यंत ते नगरची जागा कुणाला जाईल, संभाजीनगरला कुणाला जागा जाईल हेही ठरवू शकलेले नाहीत. तेव्हा त्यांनी त्यांचं घर पाहावं, आमच्या घरात डोकावू नये, असा टोला लगावतानाच मुख्यमंत्र्यांनी शिवसेना नेहमीच आमच्यासोबत होती. शंका तुमच्या मनात होती. आम्हाला याविषयी कोणतीही शंका नव्हती. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची एकत्रित शक्ती काय असते हे आता तुम्हाला पहायला मिळेल, असा इशाराही त्यांनी दिला. या वेळी लोकसभा-विधानसभा एकत्रित निवडणुकीची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली.

मुंबईच्या विकास आराखडय़ासंदर्भात कोर्टात जाण्याची विखे-पाटील यांच्याकडून धमकी दिली जात आहे. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विखे-पाटील कधी कोर्टात जाताहेत याची वाटच बघतोय, असे सांगितले. त्याचप्रमाणे प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत बोलताना कोणीही यावं. त्यांना विरोधातच काम करायचंय, असा टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरी

अर्धसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पुलवामा हल्ल्याच्या घटनेमुळे विरोधकांकडून चहापानाला येणार नसल्याचे कळवण्यात आले. मात्र हे चहापान म्हणजे सेलिब्रेशन नसते तर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी एकत्र बसून कामकाज ठरवावं म्हणून असते. तरीही विरोधकांच्या भावनांचा आदर करतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबीयांना 50 लाखांची मदत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल, अशी घोषणाही केली.

दुष्काळाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज

यंदा राज्यात मोठय़ा प्रमाणावर दुष्काळ पडला असून त्याचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. जनावरांना चारा पुरविण्यासाठी आवश्यक तिथे चारा छावण्या उभारल्या जात आहेत. या छावण्यांमध्ये आतापर्यंत 15 हजार जनावरांना समावून घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे चारा टंचाईच्या भागात चारा लागवडीलाही प्रोत्साहन दिले जात आहेत. दुष्काळग्रस्त भागांत 2019 गावं आणि चार हजार 592 वाडय़ांना दोन हजार 435 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. विरोधकांकडून दुष्काळासंदर्भात ज्या बाबी सुचवल्या जातील त्याला सकारात्मकतेने उत्तर दिले जाईल. त्यांच्या सूचनाही मान्य केल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकसभा असो वा विधानसभा मित्रपक्ष आमच्यासोबतच

रिपाइं अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्यासोबतही चर्चा झाली आहे. जानकर तसेच सदाभाऊ खोत यांच्याशीही चर्चा झाली आहे. महादेव जानकर यांच्याकडे मित्रपक्षही उद्या भेटत आहेत. आम्ही त्यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडली आहे. मित्रपक्षांशी चर्चा करून त्यांच्या जागा ठरल्यानंतरच जागा अर्ध्या अर्ध्या करणार आहोत. आम्ही याआधी विधानसभा वेगळ्या लढलो असलो तरी लोकसभा एकत्र लढलो होतो. मित्रपक्षांना लोकसभेत वेगळ्या जागा दिल्या नव्हत्या. आमच्या सोयीनुसार दोन-दोन जागा दिल्या होत्या. त्यामुळे आताही लोकसभा असो विधानसभा असो आमचे मित्रपक्ष आमच्यासोबतच राहतील. त्यांची काळजी आम्ही घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.

धनगर आरक्षणाची कार्यवाही अंतिम टप्प्यात

धनगर आरक्षणाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. आयोगाच्या अहवालानंतर शिफारशींवर कोणती कार्यवाही करावी याबाबत महाअधिवक्त्यांचा सल्ला घेतला जात आहे. त्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही लवकरात लवकर केली जाईल. गरीबांसाठी घोषित करण्यात आलेल्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ मुस्लिमांनाही मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. त्याचप्रमाणे मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले अनेक गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. जे गुन्हे मागे घेतले नाहीत त्यांचीही प्रक्रिया सुरू आहे. मात्र पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

म्हणून विरोधकांना भीती वाटतेय

युतीबाबत विरोधकांकडून होत असलेल्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले. ‘ईडी’ची भीती विरोधकांना आहे. आमच्यासाठी ईडीचा अर्थ हा एफिसिएंट डेव्हलपमेंट असा आहे. यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. मात्र विरोधकांनी ईडी लायक कामे केली आहेत. म्हणून त्यांना त्याची भीती वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.