मुंबईची पार्किंग समस्या सुटणार; ताडदेव, मलबार हिल, अंधेरी, भांडुपमध्ये ऑनलाइन आरक्षण सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील पार्किंग समस्या सोडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱया पालिकेच्या पार्किंग प्राधिकरणाकडून लवकरच ताडदेव-मलबार हिल-गिरगाव (डी), अंधेरी (के-पश्चिम) आणि विक्रोळी-भांडुपमध्ये (एस) ऑनलाइन पार्किंग आरक्षण सुविधेला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर पार्पिंगचे नियोजन आणि शुल्क रचनेचे सुसूत्रीकरण केले जाणार आहे. महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आज झालेल्या विशेष बैठकीदरम्यान तीन पालिका वॉर्डमध्ये प्रायोगिक स्तरावर वाहन व्यवस्थापन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस पार्किंगची समस्या बिकट होत चालली आहे. या समस्येचे निराकरण करण्याकरिता सार्वजनिक ठिकाणी सोयीची, सुरक्षित व परवडण्यासारखे वाहनतळ योग्य प्रकारे व विनिमयांसह उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. याच अनुषंगाने ‘मुंबईचा विकास आराखडा -2034’ आणि संबंधित ‘विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034’ नुसार मुंबईत वाहनतळ व्यवस्थापनविषयक बाबींसाठी वाहनतळ प्राधिकरणाची निर्मिती करण्याची शिफारस करण्यात आली होती. या अंतर्गत महानगरपालिकेच्या अधिकार क्षेत्रातील सर्व रस्त्यांवरील व रस्त्यालगतच्या वाहनतळांचे व्यवस्थापन, नियोजन आणि नियंत्रण करण्याशी संबंधित कार्ये या प्राधिकरणाद्वारे करण्याचे प्रस्तावित आहे. बैठकीला अतिरिक्त पालिका आयुक्त तथा नवनियुक्त वाहनतळ आयुक्त पी. वेलरासू, माजी सनदी अधिकारी तथा मुंबई वाहनतळ प्राधिकरणाचे सल्लागार रमानाथ झा आदी मान्यवर उपस्थित होते.

  • शहरातील शासकीय, व्यावसायिक व निवासी इमारतींमधील वाहनतळ जागांचा सुयोग्य वापर करण्याच्या दृष्टीने ‘वाहनतळविषयक माहितीचा साठा’ (पार्किंग पूल) तयार करण्यात येणार आहे.
  • वाहनविषयक बाबींची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी वाहनतळ मार्शल नेमण्यात येणार आहेत.
  • भंगार झालेल्या किंवा वापरात नसलेल्या वाहनांची शास्त्राेक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मुंबईतील तीन ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे.
  • भूमिगत वाहनतळ तसेच उड्डाणपुलाखालील जागांचा वापरही भविष्यात पार्किंगसाठी केला जाणार आहे.