‘पार्ले-जी’ला जीएसटीचा चटका, 10 हजार कर्मचाऱ्यांची नोकरी संकटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

जागतिक आर्थिक मंदीचे वारे आता घोंघावू लागले आहेत. देशातील सर्वात मोठी बिस्कीट निर्माती कंपनी असलेल्या पार्ले-जी कंपनीवर या आर्थिक मंदीचे सावट पसरले असून तब्बल दहा हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे. विक्री घटण्याबरोबरच जीएसटीमुळे तोटा होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

देशातील नामांकित बिस्कीट कंपनी असलेली पार्ले-जी दरवर्षी 10 हजार कोटी रुपयांच्या बिस्कीटांची विक्री करते. पण जीएसटीमुळे कंपनीला फटका बसत आहे. त्यामुळे जीएसटी दर कमी करण्याची आमची मागणी असल्याचे कंपनीचे उत्पादन विभागाचे प्रमुख मयांक शहा यांनी सांगितले आहे. तसेच 100 रुपये प्रति किलो दर असलेल्या बिस्कीटांवर सर्वात जास्त जीएसटी लागू होतो. ही बिस्कीटे पाच रुपयाच्या पाकिटात विकली जातात. पण त्यातून उत्पादन खर्चही मिळत नसल्याने कर्मचारी कपात करण्यावाचून पर्याय नसल्याचे शहा यांनी  सांगितले आहे. तसेच सरकारने आमची मागणी मान्य न केल्यास 8 ते 10 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यावाचून अन्य पर्याय नसल्याचेही शहा यांनी स्पष्ट केले आहे.

पार्ले-जी देशातील नामांकित बिस्कीट उत्पादन करणारी कंपनी आहे. देशभरात कंपनीचे 10 कारखाने असून प्रत्येक कारखान्यात लाखापेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. तसेच कंपनीचे भागीदारीतील 125 प्रकल्पही आहेत. दरम्यान, आता सर्वच बिस्कीटांवर 18 टक्के जीएसटी द्यावा लागत आहे. यामुळे कंपन्यांना उत्पादनांच्या किंमतीमध्ये वाढ करावी लागली आहे. याचा थेट परिणाम विक्रीवर झाला आहे.

तर दुसरीकडे देशातील दुसरी मोठी बिस्कीट निर्माण करणारी कंपनी ब्रिटानियानेही जीएसटीमुळे उत्पादन विक्री घटल्याचे म्हटले आहे.