पेमेंट गेटवे हॅक करून विमान तिकिटांची खरेदी

सामना प्रतिनिधी। मुंबई

ऑनलाइन हेराफेरी करून पेमेंट गेटवे हॅक करायचे. मग चुकीची माहिती देऊन पाहिजे ते विमानाचे तिकीट बुक करून संबंधिताला द्यायचे… अशा प्रकारे झोल करून ऑनलाइन तिकीट काढून देणाऱया कंपन्यांना कोटय़वधीचा चुना लावणाऱया तिघा भामटय़ांच्या गुन्हे शाखा युनिट -7 ने मुसक्या आवळल्या आहेत.

ट्रॅव्हल एजंटचे काम करणारा एक भामटा विमानाचे तिकीट काढून देतो. तिकिटावर नाव आपले असते, पण मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि तिकिटाची रक्कम वेगळीच असते अशी तक्रार युनिट-7 कडे आली होती. त्यानुसार उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे, पोलीस निरीक्षक मनीष शिरधनकर, उपनिरीक्षक आनंद बागडे, सुनयना सोनवणे व पथकाने तपास सुरू केला. तक्रारदाराने सांगितलेल्या एजंटसह अन्य दोघांना अटक केली. राजप्रतापसिंह परमार (27), प्राणसिंह परमार (47) आणि राघवेंद्र सिंह (38) अशी त्यांची नावे आहेत. राजप्रताप हा मुख्य झोलर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेटवे पेमेंटला गंडा
ऑनलाइन टेक्निकल फेरफार करून विमान तिकीट काढणाऱया अटक आरोपींनी पेमेंट गेटवेला कोटय़वधी रुपयांचा चुना लावला आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱया राजप्रताप याने ऑनलाइन झोल करायला सुरुवात केली असून विविध राज्यांत त्यांचे जाळे पसरले आहे.

एस्केप बटण दाबून हेराफेरी
ऑनलाइन तिकीट काढताना आरोपी हेराफेरी करायचे. तिकिटासाठी ऑनलाइन फॉर्म भरताना ते संबंधिताचे नाव बरोबर टाकायचे, पण मोबाईल नंबर, ई-मेल आयडी भलताच नमूद करायचे. त्यानंतर गेटवे पेमेंट करताना पेमेंट की रद्द असे ऑप्शन आल्यावर ते फॉर्म रद्द करायचे. त्याच वेळी संगणकावर फॉर्म रद्द झाल्याचा संदेश यायचा. हा संदेश येताच आरोपी एस्केप बटण दाबून ठेवायचा. मग तेव्हाच संदेश रद्द ऑप्शन डिलीट करून मान्य अशी हेराफेरी करायचे. या टेक्निकल हेराफेरीमुळे फॉर्म दाखल होऊन जे पाहिजे ते तिकीट मिळवायचे.