पुरा हिंदुस्थान… चौकीदार!-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मध्यमवर्गाला साद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

देश मजबूत करण्यासाठी प्रत्येक मुंबईकराने महायुतीला मत द्यावे. तुमचे प्रत्येक मत चौकीदाराला मजबूत करील. देश मजबूत करण्यासाठी सरकार मजबूत हवे. मजबूत सरकार चालवण्यासाठी चौकीदार मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी गावापासून शेतापर्यंत आणि देशाच्या सरहद्दीपासून हिंदुस्थानातील प्रत्येकाने चौकीदार होऊन मतदान करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बीकेसीवरील महाविराट सभेत केले. या सभेत मोदींनी मध्यमवर्गाला साद घातली. मध्यमवर्गाच्या मदतीने देशातील महत्त्वाच्या योजना पूर्णत्वास नेऊ, अशी पुस्ती मोदी यांनी जोडली.

बीकेसी मैदानातील विराट सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना मराठी भाषेत साद घालत ‘कसे काय मुंबई… सर्व काही ठीक आहे ना…’ असा प्रश्न केला. त्यानंतर मुंबईची आद्यदेवता मुंबादेवी व सर्वांचे संकल्प पूर्ण करणाऱया सिद्धिविनायकाला वंदन करून भाषणाला सुरुवात केली. आपल्या पाऊण तासाच्या भाषणात मोदी यांनी सर्वसामान्य मुंबईकरांपासून प्रामाणिक करदात्यांचे आभार मानले. या भाषणात त्यांनी मुंबईच्या किनारपट्टीचे संरक्षण करणारे कोळी बांधव, मुंबईचे डबेवाले, मुंबईची ओळख असलेल्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे चालक, सफाई कामगार आणि प्राणपणाने मुंबईचे संरक्षण करणाऱया मुंबई पोलिसांचे आभार मानले. या सभेत मोदींनी सर्वसामान्य मुंबईकरांना भावनिक साद घातली. प्रत्येकाने चौकीदार होऊन मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

देशातील 21 व्या शतकात जन्मलेला नवमतदार आज मोदीचे गोडवे का गातो याचे कोडे अनेकांना आज पडले आहे. काँग्रेस अद्यापही राजा, वंशवाद या जुन्या जोखडातच अडकून पडली आहे. केवळ एका परिवाराचे राजकारण त्यांना चालवायचे आहे. आज कोटय़वधी तरुणांच्या डोळय़ांतील आशाआकांक्षांशी त्यांना काही देणेघेणे नाही. पुढील पाच वर्षे देशासाठी फार महत्त्वाची आहेत. त्यासाठी सक्षम सरकार निवडणे महत्त्वाचे आहे असे ते म्हणाले.

संकल्प चौकीदाराचा

मोदींच्या प्रचाराचा भर ‘चौकीदार या संकल्पने’वर आहे त्याचे प्रत्यंतर याही सभेत आले. चौकीदाराच्या मुद्दय़ाचा विस्तार करताना मोदींनी उपस्थित जनसमुदायाकडून धुवपदाप्रमाणे ‘चौकीदार’ शब्द वदवून घेतला. गावागावात…. असे मोदींनी म्हणताच जनसमुदायातून एकाच सुरात ‘चौकीदार’ असा घोष घुमला. याच घोषात मोदींनी शहराशहरात… शेताशेतात… आणि देशाच्या सीमेवर असे आवाहन करताच जनसमुदायातून चौकीदाराचा गजर सुरूच होता. डॉक्टर, वकील, पत्रकार चौकीदार; शेतकरी, कामगार, दुकानदार चौकीदार; संपूर्ण देश चौकीदार अशी साद दिली. याच घोषात मोदींनी आपल्या भाषणाचा समारोप केला. या सभेला उपस्थित असलेल्यांनी देश मजबूत करण्यासाठी चौकीदार होऊन महायुतीला मतदान करण्याचा संकल्प करीत महायुतीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

2014 ला लाट होती, 2019 ला सुनामी आहे असे सांगतानाच राष्ट्र विजयाची संकल्पना घेऊन महायुतीला विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत केले. 2014 ची निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नावावर जिंकली होती आणि आताची निवडणूकही मोदी यांच्या कामावर जिंकणार आहोत असे सांगतानाच गेल्या तीन टप्प्यांतील मतदानावरून महायुतीलाच कौल मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच्या राजवटीत मुंबईला जे मिळाले नाही ते नरेंद्र मोदी यांचा काळात मिळाले, अशी कृतज्ञता व्यक्त करतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईकरांच्या वतीने पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. मेट्रो रेल्वे, वर्सोवा वांद्रे सी-लिंक, उपनगरीय लोकलचा विकास यामुळे मुंबई आता बदलतेय. उपनगरीय लोकलच्या सुविधांसाठी केंद्र सरकारने एकरकमी 65 हजार कोटी रुपये दिले, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पुढाकाराने 500 फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला, 2011 पर्यंतच्या झोपडीवासीयांना घरे देण्यासाठी सरकारने पात्र केले, असेही फडणवीस यांनी या वेळी सांगितले.

कोल्हे, लांडगे, पोपटांची महायुतीसमोर खैर नाही!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह 56 पक्षांच्या महाआघाडीवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, ‘‘एका जंगलात निवडणूक होणार होती. त्यासाठी कोल्हे-लांडगे एकत्र आले. सरकार बनवायचे म्हणून त्यांनी एक पोपटही सोबत घेतला. या कोह्या-लांडग्यांनी आणि पोपटाने सिंहावर आरोप सुरू केले. पण त्यांना माहीत नव्हते की वाघ आणि सिंह एकत्र येणार आहेत. आता वाघ-सिंह एकत्र आलेत त्यामुळे कोल्हे, लांडगे आणि पोपटांची महायुतीसमोर खैर नाही, असा टोला त्यांनी लगावला.

आता आत टाकणार

2014 ला सत्तेत आलो तेव्हापासून आतापर्यंत अनेकांना तुरुंगात घातले आहे तर अनेकजणांना तुरुंगाच्या दारापर्यंत पोहोचवले आहे. 2019 चे सरकार येईल तेव्हा त्यांना तुरुंगात घातल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.देशाला ज्यांनी इतके वर्षे लुटले त्यांना आपण सोडणार नसल्याचेही ते म्हणाले. काँग्रेस गेल्या निवडणुकीत 44 जागा जिंकली. पण आता ती 40 जिंकेल की 50 च्या आतच गुंडाळली जाईल अशीच चर्चा राजकीय पंडित करत आहेत. 8 जागा, 20 जागा लढविणारे पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पाहत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

मी शिवछत्रपतींचा मावळा

मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे असे सांगत मोदी म्हणाले की, दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर केवळ गृहमंत्री, मंत्री बदलून गप्प बसण्याचे दिवस आता संपले. दहशतवाद्यांनी जर आगळीक केली तर ते पाताळात जरी लपून बसले तरी शोधून काढून मारू. हे आम्ही केवळ बोलत नाही तर करूनही दाखविले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेस मध्यमवर्गीयांना स्वार्थी म्हणते. पण त्याच मध्यमवर्गीयांच्या साथीने आज आम्ही देशातील सर्व महत्त्वाच्या योजना चालवत असल्याचे ते म्हणाले. देशासाठी पुढील पाच वर्षे फार महत्त्वाची आहेत. त्यामुळे ही निवडणूक देशाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. सक्षम सरकार सत्तेवर असणे गरजेचे आहे. त्यासाठी भाजपा-शिवसेना महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

शिवसेनाप्रमुखांना वंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून केली. वाराणासीमध्ये माझा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आवर्जुन उपस्थित होते. प्रचाराच्या धावपळीतून ते उपस्थित राहिले त्यामुळे महायुतीला ताकत मिळाली, अशा शब्दांत मोदींनी आभार मानले.

क्षणचित्रे

शिवसेना-भाजप-रिपाइं-रासपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी या सभेला गर्दी केली होती. एरवी वाहनांच्या ट्रफिकने फुलणारा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सचा परिसर आज गर्दीने फुलला होता. सभास्थानी बसायला जागा न मिळाल्याने हजारो लोक रस्त्यावर उभे राहून भाषणे ऐकत होते. त्यांच्या सोयीसाठी मोठमोठय़ा स्क्रिन लावण्यात आल्या होत्या.

  • मोदींचे मुखवटे घालूनही अनेक जण सभास्थानी उपस्थित होते.
  •  सुरक्षेसाठी वांद्रे स्थानकापासून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील टप्प्याटप्प्यावर पोलीस तैनात होते. ठिकठिकाणी राज्य   राखीव दलाचे जवान तैनात होते.
  • नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन होताच टाळय़ांचा कडकडाट झाला.
  •  सभेला आलेल्या लोकांनी गळय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे असलेल्या टोप्या आणि उपरणी घातली होती.

मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानी मोदींच्या सभेत
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा देणारे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आज वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील महायुतीच्या सभेला पोहोचला. भाजप नेत्यांसोबत तो बसला होता. अनंतला पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ‘‘मी इथे देशाला पाठिंबा देण्यासाठी आलोय, नरेंद्र मोदी यांना ऐकायला आलोय’’ असे अनंतने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.