गणपत गायकवाडची व्हॉईस टेप पोलिसांकडे, मुख्यमंत्री शिंदेंनी करोडो रुपये हडपल्याचा आरोप रेकॉर्डवर येणार

भाजप आमदार गणपत गायकवाड याने मिंधे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाडवर पोलीस ठाण्यातच गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारानंतर त्याने कबुली दिली होती. सकृतदर्शनी पुरावा म्हणून हे संभाषण महत्त्वाचे असल्याने पोलिसांनी आज संबंधित वृत्तवहिनीच्या मुंबईतील कार्यालयातून हे व्हॉईस रेकॉर्ड ताब्यात घेतले. या व्हॉईस रेकॉर्डमध्ये गायकवाड याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावर गंभीर आरोप करताना आपले कोटय़वधी रुपये खाल्याचे सांगितले होते. हे आरोप पोलीस रेकॉर्डवर येणार असल्याने भविष्यात शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत.

मिंधे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. आमदार गणपत गायकवाड यांनी आठ दिवसांपूर्वी महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यातच गोळय़ा झाडल्या होत्या. या प्रकरणात गणपत गायकवाड यांना अटक केली असली तरी अद्याप त्यांचा मुलगा पोलिसांना सापडू शकला नाही. भाजपच्या दबावामुळे त्याला पोलीस अटक करत नसल्याचा मिंधे गटाचा आरोप आहे. दरम्यान आज ठाणे क्राइम ब्रँचच्या पथकाने गणपत गायकवाड यांचे व्हाईस रेकॉर्ड ताब्यात घेतले. हल्ल्यानंतर गायकवाड यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या दडपशाहीमुळे आपल्याला हे पाऊल उचलावे लागल्याची प्रतिक्रिया दिली होती. शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात गुंडांचीच पैदास होईल असे सांगतानाच गणपत गायकवाड यांनी आपले कोटयवधी रुपये एकनाथ शिंदे यांनी खाल्ल्याचा आरोप केला होता.

मुख्यमंत्र्यांना बर्थडे गिफ्ट

गोळीबाराच्या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना पक्षात एकटे पाडले जात असल्याचा संताप कल्याण-डोंबिवलीतील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन व्यक्त केला होता. मिंधे गटाच्या दबावापुढे वरिष्ठ नेते मूग गिळून गप्प असले तरी आम्ही गणपत गायकवाड यांच्या पाठीशी ठाम असून मिंधेंना भीक घालणार नाही असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला होता. यामुळे हडबडलेली भाजप कार्यकर्त्यांची नाराजी शमवण्यासाठी ऍक्शन मोडवर आली. गणपत गायकवाड यांच्या आरोपाचे व्हाईस रेकॉर्ड ताब्यात घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या वाढदिवशीच ‘भविष्यातील अडचणीचे’ बर्थडे गिफ्ट दिल्याची चर्चा आहे.