
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर हल्ला करण्याची धमकी खलिस्तानवादी अतिरेक्यांनी दिल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. यानंतर मुंबई शहराची सुरक्षा अजून कडक करण्यात आली असून नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच शुक्रवारच्या पोलिसांच्या सर्व सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.
खलिस्तानी अतिरेकी मुंबईवर हल्ला करू शकतात अशी सूचना गुप्तचर विभागाकडून मिळाली आहे. त्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट झाले आहेत. या सूचनेनंतर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, वांद्रे, चर्चगेट, कुर्ला आणि अन्य स्थानकांची सुरक्षा वाढविण्यात आल्याचे रेल्वे पोलीस आयुक्त पैसर खलीद यांनी म्हटले आहे. तीन हजारांहून अधिक रेल्वे पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असून सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

























































