
मी प्रेयसीला खूप मिस करतोय. तिला भेटायला जायचे आहे. तिच्याकडे जाण्यासाठी कोणत्या स्टिकरचा वापर केला पाहिजे… अशी विचारणा एका प्रियकराने मुंबई पोलिसांना ट्विटद्वारे केली आहे. तर पोलिसांनी त्याला रिट्विट करीत घरीच थांबायचे आवाहन केले आहे. घरीच रहा, स्वस्थ रहा… तुमच्या भावी आयुष्यासाठी सध्या हेच महत्त्वाचे आहे, असे सांगत पोलिसांनी त्याची समजूत काढली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशातच अश्विन विनोद या तरुणाने ‘मला सध्या प्रेयसीची खूप आठवण येतेय, तिला भेटण्यासाठी वाहनाला कोणत्या रंगाचा स्टिकर लावू’ असा प्रश्न मुंबई पोलिसांना ट्विटरवर विचारला होता.
त्यावर पोलिसांनीदेखील त्याला नम्रपणे रिट्विट करीत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. प्रेयसीला भेटणे तुमच्यासाठी आवश्यक आहे, हे आम्ही समजू शकतो. परंतु तुमची ही आवश्यक बाब आमच्या अत्यावश्यक सेवेत मोडत नाही. तुम्ही एकमेकांपासून दूर आहात, परंतु यामुळे तुमच्यातील प्रेमाची ओढ आणखी वाढेल. सद्यस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे घरीच थांबणे हेच आपल्या सुरक्षेसाठी योग्य आहे. आणखी काही वेळ ही परिस्थिती राहील. तोपर्यंत घरातच स्वस्थ रहा. तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा, असे पोलिसांनी अश्विनला रिट्विट केले आहे.


























































