
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध भागांत आंदोलनांची नोंद झाली आहे. या परिस्थितीचा विचार करून मुंबई पोलिसांनी शहरभर सतर्कतेचा इशारा दिला असून विशेषतः इराण, अमेरिका आणि इस्रायलच्या दूतावास परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी सर्व अधिकाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. इराणच्या समर्थनार्थ किंवा विरोधात होणारी आंदोलने हिंसाचारासाठी आडोसा ठरू शकतात, अशी शक्यता व्यक्त करत पोलिसांनी विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. दंगल, जाळपोळ किंवा इतर कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटना टाळण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी गस्त वाढविणे, संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवणे तसेच गुप्त माहिती संकलन यावर भर दिला जात आहे. परिस्थितीवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






























































