
ओशिवरा येथील गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल आर खानबाबत मुंबई पोलीस मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. गोळीबार प्रकरणी कमाल खानला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे पोलीस कमाल खानचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत प्रस्ताव मुंबई पोलिसांकडून आयुक्तांकडे सादर केला जाण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवडय़ात ओशिवरा येथील एका इमारतीत दोन घरांच्या कपाटात आणि भिंतीमध्ये दोन गोळ्या आढळून आल्या. गोळीबार नेमका कोणी व का केला याचा तपास ओशिवरा पोलिसांनी केला. पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि एआय टूल्सचा वापर करून कमाल खानला अटक केली. फॉरेन्सिक अहवालात त्या गोळ्यांची माहिती मिळाली. त्या गोळ्या परवानाधारक शस्त्रातील असल्याचे उघड झाले. तसेच त्या शस्त्राचा परवाना हा दिल्लीतून हस्तांतरित झाल्याची माहिती मिळाली. आज अभिनेता कमाल खानला अंधेरी येथील न्यायालयात हजर केले होते. सरकारी वकिलांनीदेखील जोरदार युक्तिवाद केला. युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. कमाल खानच्या वतीने त्याच्या वकिलांनीदेखील युक्तिवाद केला.






























































