हवाई दलाचे विधिमंडळात कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानात घुसून केलेल्या ‘जैश ए मोहम्मद’ संघटनेचा तळ उद्ध्वस्त करणाऱया हिंदुस्थानी हवाई दलावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. हवाई दलाने केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, देशावर काईट नजर टाकणाऱयांना अशाच पद्धतीने चोख उत्तर द्या, अशा शब्दांत सत्ताधारी व विरोधकांनी आपली भूमिका मांडली.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर हिंदुस्थानी सेनेने दिल्यानंतर त्याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उमटले. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावास सर्पवक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला.

 देशावर कोणी वाईट नजर टाकत असेल तर त्यांना असेच चोख उत्तर मिळाले पाहिजे. हिंदुस्थानी सेनेने केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे  कौतुक केले. देशावर जेव्हा संकट येते तेव्हा आम्ही 125 कोटी हिंदुस्थानी एक असल्याचे दाखवून दिले आहे. यात आम्ही एक हिंदुस्थानी नागरिक म्हणून सहभागी आहोत असे पवार म्हणाले. तर पुलवामा घटनेनंतर ठोस उत्तर देण्याची गरज होती. आज हिंदुस्थानी वायुसेनेने पाकिस्तानच्या घरात घुसून कारवाई केली. या घटनेचे काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिनंदन करतो, असे काँग्रेसचे आमदार नसीम खान म्हणाले. या घटनेमुळे देशवासीयांची छाती भरून आल्याचे सांगत ज्याप्रमाणे 1972 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले तसेच आता पुन्हा आणखी एक तुकडा करण्याची गरज असल्याचे खान म्हणाले.

 महाराष्ट्राच्या वतीने वायुदलाचे अभिनंदन

विधानसभेत मुख्यमंत्री म्हणाले, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला वायुसेनेने दिलेले चोख प्रत्युत्तर ही अभिमानाची बाब आहे. सैन्य आणि वायुदलाने पाकव्याप्त कश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर बॉम्बिंग करून ते नेस्तनाबुत केले आहे. हिंदुस्थान कमजोर नसून जगातील मजबूत सैन्य अन्य देशांपैकी एक असल्याचे सैन्याने सिद्ध केले आहे. हिंदुस्थानींसाठी ही गौरवाची बाब असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वतीने सैन्य आणि वायुदलाचे अभिनंदन केले.

आमची छाती 56 इंचाची झाली

वायुदलाचे कौतुक करताना शिवसेनेचे आमदार सुभाष साबणे यांनी सीमेवरील जवान आमचा आत्मा असून आज आमची छाती 56 इंचाची झाल्याचे म्हणाले. तर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी देशातील जवानांना सॅल्यूट करताना ‘पाकिस्तानवाले होश मे आओ,’ नाहीतर जगाच्या नकाशावरून गायब व्हाल, असा संताप व्यक्त करीत सैन्यदलाचे अभिनंदन केले. शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांनीही देशातील सैनिकांचे अभिनंदन केले.