मुंबईतील 400 पैकी 300 ठिकाणे पूरमुक्त! 171 ठिकाणी काम पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असताना पालिकेची पावसाळापूर्व कामेही वेगाने सुरू आहेत. यामध्ये पाणी तुंबणाऱया 405 ठिकाणांपैकी 171 ठिकाणे पूरमुक्त झाली असून 125 ठिकाणी काम अंतिम टप्प्यात असून पावसाळ्याआधी हे काम पूर्ण होणार आहे. तर पाणी साचणाऱया सखल भागांतील पाणी उपसा करण्यासाठी 470 पंप बसविण्यात येणार आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी पालिकेकडून सुरू असणाऱया कामांची माहिती दिली.

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे पालिका पावसाळापूर्व कामे वेगाने करीत आहे. यामध्ये महत्त्वाचे काम असणारी नालेफसाई 50 टक्के पूर्ण झाली आहे. पालिका कार्यक्षेत्रातील पाणी साचणाऱया ठिकाणांचे बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये पाणी साचणाऱया 44 ठिकाणांचे काम 2022च्या पावसाळ्याआधी तर 8 ठिकाणचे काम पावसाळ्यानंतर केले जाणार आहे तर रेल्वे, ‘म्हाडा’, ‘एमएमआरडीए’, ‘एसआरए’च्या हद्दीमधील पाणी साचणाऱया 43 ठिकाणीही काम होण्यासाठी समन्वय साधण्यात येत आहे. या ऑनलाइन बैठकीला जल अभियंता अजय राठोर, पर्जन्य जलनिस्सारण प्रमुख अभियंता कमलापूरकर, रस्ते व वाहतूक प्रमुख अभियंता राजेंद्र तळकर आदी उपस्थित होते.

गांधी मार्केट पूरमुक्तीसाठी 14 कोटींचा खर्च

  • गांधी मार्केटजवळील मिनी पंपिंग स्टेशनमुळे आता पाण्याचा निचरा वेगाने होत आहे. या परिसराला आणखी दिलासा देण्यासाठी 16 हजार क्युबिक मीटर प्रतितास पाणी उपसा करू शकणारे 2 पंप बसविण्यात येत आहेत. 1200 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीतून हे पाणी भरून भारतनगर रेल्वे नाल्याजवळ सोडण्यात येईल. यासाठी 14 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
  • कांजूरमार्ग पूर्व येथील नियोजित मेट्रो स्टेशन यार्डपासून साई नाल्यापर्यंत पाण्याचा निचरा होण्यासाठी पालिकेकडून काम करण्यात येत आहे. तसेच सॅण्डहर्स्ट रेल्वे स्थानक परिसरातून पाण्याचा निचरा होण्यासाठी 1800 मिलीमीटर व्यासाच्या भूमिगत वाहिनीचे काम मध्य रेल्वे पावसाळ्याआधी पूर्ण करणार आहे. यासाठी पालिका 25 मीटर लांबीचे आरसीसी बॉक्स ड्रेन बांधत आहे.

अतिवृष्टीत ‘हिंदमाता’चे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये साठवणारअतिवृष्टीत पाणी साचल्याने नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हिंदमाता या ठिकाणी 60 हजार क्युबिक मीटर पाणी साठवता येणारी भूमिगत टाकी प्रमोद महाजन उद्यान येथे, तर 40 हजार क्युबिक मीटर पाणी साठवता येणारी टाकी सेंट झेवियर्स मैदान येथे बांधण्यात येत आहे.

हिंदमाता पुलाखाली व मडकेबुवा चौकातदेखील भूमिगत टाकी बांधण्यात येत आहे. अतिवृष्टीत टाक्यांमध्ये पाणी साठवल्याने या ठिकाणची पूरस्थिती बंद होणार आहे. पाऊस थांबल्यानंतर आणि ओहोटी आल्यानंतर हे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांमधून निचरा केले जाईल.