दहा वर्षात पावसाचा दुसऱ्यांदा रेकॉर्ड, मुंबईत शनिवारी कोसळला 234 मिलिमीटर पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबापुरीत उशिरा दाखल झालल्या वरुणराजाची गेल्या तीन दिवसांपासून जोरदार बॅटिंग सुरू आहे. शुक्रवारी संततधार कोसळणाऱया पावसाने शनिवारी धुवाधार बरसत गेल्या दहा वर्षांत दुसऱयांदा रेकॉर्ड केला आहे. सांताक्रुझ येथे एकाच दिवसात 234 मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. एका दिवसात 204 मिलिमीटरपेक्षा जादा पावसाची नोंद झाल्यास त्याला अतिवृष्टी समजली जाते. याआधी 2015 मध्ये मुंबईत 283 मिलीमीटर एवढय़ा पावसाची नोंद झाली होती.

अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’ वादळामुळे मान्सूनचे वेळापत्रक पुरते बिघडले होते. 7 जूनपर्यंत मुंबईत दाखल होणारा मान्सून पंधरा-वीस दिवस उशीर झाल्याने मुंबईकर चिंता व्यक्त करत होते, मात्र उशिरा आलेल्या मान्सूनने गेल्या तीन दिवसांत जून महिन्याची कसर भरून काढली असून एरवी जूनमध्ये होणाऱया पावसाच्या तुलनेत 97 टक्के पाऊस झाला आहे. शनिवारी मुंबईत सांताक्रुझ येथे 234 मिलिमीटर, ठाण्यात 237 तर नवी मुंबईत 245 मिलिमीटरची नोंद झाली असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

पुढील आठवडय़ात जोरदार पाऊस
सध्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचा प्रभाव आहे. यामध्ये पुढील दोन-तीन दिवसांत वाढ अपेक्षित असल्याने वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे पुढील आठवडय़ात मुंबईसह किनारपट्टी परिसरात जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

प्रतापगडाकर रोप वे
छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावर पर्यटकांना पोहचण्यासाठी जावळी गाव (ता. महाबळेश्वर) ते प्रतापगड असा रोपवे होणार आहे. पर्यटन धोरण 2016 अंतर्गत या रोपवे प्रकल्पाला विशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे. जावळी गाव ते लँडकिक पॉइंट तसेच प्रतापगड असा हा 5.6 किमी लांबीचा विशाल रोपवे प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे भविष्यात प्रतापगडावर येणाऱ्या पर्यटकांना चढण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. प्रतापगडावर होणारा रोपवे प्रकल्प हा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा प्रकल्प असेल. या रोपवेमुळे महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवात भर पडणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.