मुंबईत पाणी साचणारी 223 ठिकाणे पूरमुक्त!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिल्यामुळेही पालिकेने पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू केली आहेत. यामध्ये आतापर्यंत मुंबईत पाणी साचणारी २२३ ठिकाणे योग्य उपाययोजना केल्यामुळे पूरमुक्त झाली आहेत, तर २४ ठिकाणी काम सुरू असल्यामुळे पावसाळ्याआधी ही ठिकाणेही पूरमुक्त होणार आहेत. तर ४० ठिकाणी मात्र पावसाळ्यात आणि नंतरही पालिकेला काम सुरू ठेवावे लागणार आहे.

मुंबईचे अनेक भाग हे समुद्रसपाटीपासून खोलगट असल्यामुळे अतिवृष्टीच्या काळात भरती आल्यास पाणी साचण्याचे प्रकार घडतात. याशिवाय प्लॅस्टिक कचर्‍यामुळेही पाणी वाहून जाण्यात अडथळे निर्माण झाल्याने पाणी साचते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून मुंबईत प्लॅस्टिकबंदी प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. शिवाय पाणी साचणार्‍या ठिकाणी पंप बसवणे, नवीन पर्जन्य जलवाहिन्या टाकणे, पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवल्यामुळे पाणी साचणारी ठिकाणे कमी होत आहेत. यामध्येही यावर्षीदेखील पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून विविध पातळ्यांवर काम सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडून देण्यात आली.

अशी आहे स्थिती
– मुंबईत २०१७ मध्ये पाणी साचणारी २२५ ठिकाणे होती. यात २०१८ मध्ये ४८ आणि २०१९ मध्ये ६३ ठिकाणाची भर पडल्याने एकूण पाणी साचणारी ठिकाणे ३३६ झाली.

– मात्र पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे २२३ ठिकाणे पूरमुक्त झाली आहेत. तर आणखी २४ ठिकाणे पावसाळ्याआधी पूरमुक्त होणार आहेत.

– याशिवाय १४ ठिकाणी पावसाळ्यातही काम सुरू राहणार आहे. तर २८ ठिकाणांची पाणी साचू नये यासाठी पालिका नियोजन करीत असून सात ठिकाणी काही बांधकामांमुळे काम सुरू झालेले नाही.