पावसाचा लोकल सेवेवर परिणाम झाला आहे का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळवारी पहाटेपासूनच मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पहाटेपासून सतत बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी पोचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम जाणवत आहे. मुंबईतील पूर्वद्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, सायन पनवेल मार्ग, एलबीएस मार्ग, एस व्ही मार्ग अशा महत्वाच्या मार्गांवरील वाहतुकीला फटका बसला आहे. सकाळपासूनच काही ठिकाणी रस्ते जलमय झाल्यामुळे शाळकरी मुलांना तसेच कार्यालयांमध्ये जाणाऱ्या मुंबईकरांना साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत होती.

मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचा लोकल सेवेवर देखील परिणाम झाला आहे. मध्य हार्बर आणि पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. सकाळपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेक ठिकाणी लोकल उशिराने पोहोचत आहेत. यामुळे सकाळपासूनच लोकल प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्या तरीदेखील कुठल्याही मार्गावर रेल्वे वाहतूक ठप्प झाली नसल्याचे रेल्वे प्रश्नाच्या वतीने सांगण्यात येत आहे. लोकल उशिराने धावत असल्यामुळे सकाळपासूनच कार्यालयांमध्ये जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. कुर्ला, दादर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, पनवेल, विरार, बोरीवली या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

गेल्या २४ तासात मुंबईत जोरदार पाऊस बरसला. आता हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. पुढील 24 तासांत मुंबईत काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा इशारा आहे. सोमवारी सायंकाळनंतर पावसाने संततधार सुरू ठेवल्याने दादर टीटी, वडाळा, शीव, अंधेरी, परळ, कुर्ला, चेंबूर, अंधेरी, वांद्रे, बोरिवली, मालाड आदी ठिकाणी सखल भागात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. काही ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. पालिकेने सखल भागात पाणी साचलेल्या ठिकाणी पंप लावून पाण्याचा उपसा केल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली. मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या तसेच शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या आहेत. आजही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आल्याने मुंबईकरांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.