बाप्पाचे मंडपाकडे आगमन खड्डय़ातूनच, पालिकेची रस्ते डागडुजी सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वांचा लाडका गणेशोत्सव अवघ्या तीन आठवडय़ांवर आला असतानाही मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य कायम असून आता अभियंत्यांना पालिका प्रशासनाने रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले आहेत. पुढील दहा दिवसांत रस्त्यांची डागडुजी पूर्ण करा, असे निर्देश आता नव्याने देण्यात आले आहे. यामुळे बडय़ा मंडळांच्या बाप्पांचे मंडपात आगमन खड्डय़ातूनच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील अनेक बडय़ा मंडळांच्या मोठय़ा गणेशमूर्ती लालबाग, परळ परिसरातून मंडपाकडे रवाना होतात. बडय़ा मंडळांकडून मोठमोठे देखावे आणि मंडपाची सजावट मोठय़ा प्रमाणात केली जात असल्याने महिनाभर आधीच बाप्पाची मूर्ती मंडपाकडे निघते. मात्र सद्यस्थितीत बाप्पाच्या आगमन मार्गावर खड्डय़ांचे साम्राज्य असल्याने पालिकेचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे सर्व अभियंत्यांना कार्यक्षेत्रावर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. श्रीगणेशाच्या आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत. गणेशोत्सवादरम्यान रस्त्यासंबंधित कोणत्याही समस्येला सामना करावा लागू नये. या दृष्टीने येत्या दहा दिवसांत युद्धपातळीवर कामे करून सर्व रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त पालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी संबंधितांना दिले आहेत. ‘मास्टिक’ पद्धतीने रस्ते दुरुस्ती करण्याचे परिणाम चांगले आढळतात. त्यामुळे मास्टिक पद्धतीनेच रस्त्यांची दुरुस्ती करावी, असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.

– गणेशोत्सवादरम्यान मुंबईकर नागरिकांना कोणत्याही गैरसोयींचा सामना करावा लागू नये याची खबरदारी पालिकेकडून घेतली जात आहे. पालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागामार्फत खड्डेमुक्त रस्त्यांसाठी 227 दुय्यम अभियंत्याची नेमणूक करण्यात आली आहे. दुय्यम अभियंता नेमून दिलेल्या विभागात दररोज रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे आढळल्यास ते मास्टिक पद्धतीने तत्काळ बुजवत आहेत. दुय्यम अभियंत्यांच्या बरोबरीने सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी प्रत्यक्ष फिल्डवर स्वतःहून सक्रियपणे रस्त्यांची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती डागडुजी करावी, असे निर्देश बांगर यांनी दिले आहेत.