
हैदराबाद येथून विमानाने मुंबईत येऊन घरफोडी करणाऱया तिघांना पवई पोलिसांनी अटक केली. गौस पाशा मोईनउद्दीन शेख आणि तौसीफ मोहम्मद मंगल कुरेशी आणि मोहंमद सलीम हकीम कुरेशी सलीम अली अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांविरोधात मुंबई, पुणे, नागपूर येथे गुन्हे दाखल आहेत. घरफोडीच्या गुह्यात त्या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार हे व्यावसायिक असून ते पवई परिसरात राहतात. त्यांच्याकडे शैला नावाची महिला घरकाम करते. गेल्या महिन्यात तक्रारदार हे पत्नीसोबत फिरायला आगरतळा येथे गेले होते. शैला घरकाम करून घराला टाळे लावून निघून जायची. 18 सप्टेंबरला शैला नेहमीप्रमाणे कामावर आली तेव्हा तिला तक्रारदार यांच्या घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. चोरटय़ांनी घरातून पैसे, सोन्याचे दागिने आणि परदेशी चलन असा 25 लाखांचा ऐवज घेऊन पळ काढला. तिने घरात घरफोडी झाल्याची माहिती तक्रारदार यांना दिली. पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. परिमंडळ-10चे पोलीस उपायुक्त महेश रेड्डी यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक आबूराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कृष्णा हरगुडे, सहाय्यक निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक विनोद लाड, यश पालवे आदी पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर पोलिसांना एका गाडीतून तीन जण संशयास्पद जाताना दिसले. त्यावरून तपासाची चव्रे फिरली. गोवंडी परिसरात पोलिसांनी सध्या वेशात सापळा रचून गौस आणि तौसीफला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्या दोघांनी मोहंमद सलीमच्या मदतीने घरफोडी केल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यांच्या चौकशीत सलीमचे नाव समोर आले. पोलिसांनी शनिवारी त्याला अटक केली. सलीम कुरेशी हा मुख्य सूत्रधार असून त्यानेच घरफोडीचा कट रचला. ते तिघे चोरी करण्यासाठी विमानाने हैदराबाद येथून मुंबईला येत. ते काही दिवस गोवंडी परिसरात राहत. रेकी करून घरफोडी करत. त्यानंतर ते पुन्हा विमानाने हैदराबादला जात, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
























































