
सामना प्रतिनिधी । मुंबई
गेले दोन महिने सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाचा फैसला गुरुवारी होणार आहे. अत्यंत चुरशीची लढत असलेल्या महाराष्ट्रात कोण बाजी मारणार याकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. मागच्या निवडणुकीत ‘छत्रपतीजी का आशीर्वाद, चलो दे मोदी का साथ’ अशी घोषणा देत मैदानात उतरलेल्या शिवसेना-भाजप युतीने 48 पैकी 42 जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली होती. यावेळी बहुतांश एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीचे वर्चस्व राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून तसे वातावरण सर्वत्र आहे.
2014 च्या निवडणुकीत आघाडी सरकारच्या विरोधातील असंतोषामुळे देशभर निर्माण झालेल्या लाटेचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बसला आणि महाराष्ट्रात महायुतीने बाजी मारली. या निवडणुकीत मागील वेळेपेक्षा सरासरी चार ते पाच टक्के मतदान वाढले आहे. हे वाढलेले मतदान कुणाच्या झोळीत जाणार हे निवडणूक निकालातून स्पष्ट होईलच पण शिवसेना-भाजपने आघाडीच्या विरोधात तयार केलेली व्होट बँक ताब्यात घेणे काँग्रेस-राष्ट्रवादीला अवघड असल्याचे यावेळी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीतून दिसत असून अब की बार महायुतीच असेच एकंदर चित्र महाराष्ट्रात आहे.
लक्षवेधी लढती
महाराष्ट्रात एखाददुसरा अपवाद वगळता सर्वच मतदारसंघांत अत्यंत चुरशीच्या लढती होत आहेत. नागपूरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसचे नाना पटोले यांच्यात थेट सामना होत आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यापुढे काँग्रेसच्या सुरेश धानोरकर यांनी आव्हान उभे केले असले तरी विदर्भातील मतदारांची साथ भाजपला असल्याचे वातावरण आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि भाजपचे प्रताप चिखलीकर यांच्यात एकास एक लढत होत आहे. उत्तर मुंबईत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी काँग्रेसच्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे.
पवार, विखेंची प्रतिष्ठा पणाला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती या बालेकिल्ल्यात सुप्रिया सुळे यांच्यासमोर भाजपच्या कांचन कुल यांनी आव्हान उभे केले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीवरून पवार कुटुंबात झालेला कलह लपून राहिलेला नाही. या दोन जागांमुळे पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नगर लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसच्या राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपले विरोधी पक्षनेतेपद पणाला लावले असून त्यात ते कितपत यशस्वी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई-ठाण्यात महायुतीचा बोलबाला
2014 च्या निवडणुकीत आघाडी सरकारच्या विरोधातील असंतोषामुळे देशभर निर्माण झालेल्या लाटेचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बसला आणि मुंबई-ठाण्यात महायुतीने बाजी मारली. या निवडणुकीत मागील वेळेपेक्षा सरासरी चार ते पाच टक्के मतदानाची काढलेली संख्या आणि 2014च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप उमेदवारांनी घेतलेली लाखोंची आघाडी याचा विचार करता मुंबई-ठाण्यात ‘अब की बार’देखील महायुतीचाच आवाज घुमणार.
कोकणात शिवसेनाच
कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघात विरोधकांत झालेली फाटाफूट आणि शिवसेना-भाजपची ताकद पाहता शिवसेना उमेदवारच बाजी मारणार असे वातावरण आहे.
बहुजन वंचित आघाडीचा फटका कुणाला?
प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते चिंतेत आहेत. स्वत; प्रकाश आंबेडकर सोलापूर व अकोला येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची अडचण झाली आहे. याशिवाय औरंगाबाद व सांगली येथे वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील व गोपीचंद पडळकर यांनी चांगली लढत दिली. याशिवाय अनेक मतदारसंघांतही वंचित आघाडीचे उमेदवार चांगली लढत देण्याची शक्यता असून त्याचा फटका कुणाला बसणार याची उत्सुकता सर्वांना आहे.
भाजप करणार दुपारपासूनच जल्लोष
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मतांची पडताळणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यामुळे यावेळी लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल रात्री 8 वाजता जाहीर होण्याची शक्यता आहे. असे असतानाही भाजपचे आमदार राज पुरोहित यांनी मात्र उद्या दुपारी 12 वाजल्यापासूनच भाजपच्या वतीने विजयी जल्लोष साजरा करण्यात येईल असे जाहीर करून टाकले आहे. दुपारी 12 वाजल्यापासून लाडूवाटपाचा कार्यक्रम तर सायंकाळी 5 वाजता केक कापून विजयाचा आनंदोत्सवही साजरा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा निकालाचे प्रत्येक अपडेट कळावेत यासाठी पुरोहित यांच्या वतीने काळबादेवी रोड येथे भारत भवन, पहिला मजला, राऊंड बिल्डिंगच्या समोर एक भव्य एलईडी क्रीनही लावण्यात येणार आहे.
मतमोजणीसाठी मुंबई पोलीस सज्ज
मुंबई शहरातील सहा लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी आज तीन ठिकाणी करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मतांचे आकडे ऐकण्यासाठी सर्वच पक्षांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने एकवटणार असल्याने तेथे गडबडगोंधळ किंवा तणावाचे वातावरण तयार होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात असणार आहे.
गोरेगावातील नेस्को, विक्रोळी येथील उदयांचल विद्यालय आणि शिवडीतले न्यू शिवडी वेअर हाऊस येथे मतमोजणी होणार आहे. त्या प्रत्येक ठिकाणी दीड हजार अधिकारी आणि कर्मचारी, तसेच सीआरपीएफ, एसआरपीएफ, क्यूआरटी, आरसीपी आणि होमगार्डची पथके तैनात राहणार आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी वरिष्ठ अधिकारीदेखील दिवसभर सर्व हालचालीवर लक्ष ठेवून असणार असून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलीसदेखील तैनात राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनीदेखील सहकार्य करावे, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
मतमोजणी सुरू झाल्यानंतर काही समाजकंटकांकडून अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवेवर किंवा खोटय़ा माहितीवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये. कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर तणावाचे वातावरण निर्माण न करता 100 नंबरवरून पोलीस नियंत्रण कक्षाशी किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पोलिसांना माहिती द्यावी, असे मुंबई पोलिसांकडून आवाहन करण्यात येत असल्याचे उपायुक्त मंजुनाथ शिंगे यांनी सांगितले.





























































