
मोठय़ा सायकलपटूंनी रचलेल्या नवनव्या विक्रमांबद्दल आपण नेहमीच ऐकतो. परंतु नवी मुंबईतील अवघ्या सात वर्षांच्या श्रावण मोरे या चिमुकल्या सायकलपटूनेदेखील काwतुकास्पद कामगिरी केली आहे. त्याने सलग 16 तास सायकल चालवून 200 किमीचा पल्ला गाठला आहे. इतक्या कमी वयात सायकलवरून एवढे अंतर कापण्याचा विक्रम आजवर कोणीही केलेला नाही. त्यामुळे श्रावणच्या नावाची गिनीज बुकात नोंद व्हावी यासाठी त्याचे कुटुंबीय प्रयत्नशील आहेत.
श्रावणने ही मोहीम 10 मार्चला रात्री 9.30 वाजता कळस उद्यान, कोपरखैरणे येथून सुरू केली होती. पनवेल-खोपोली – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-पळसदरी रोड कर्जत ते माथेरान वांगीपर्यंत 100 किलोमीटर आणि परत त्याचमार्गे वाशीपर्यंत असे 200 किमी अंतर त्याने पार केले. 11 मार्चला दुपारी 1.15 वाजता त्याच्या
या मोहिमेची सांगता झाली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रवास त्याने न थकता हसतमुखाने आणि एका तरबेज सायकलपटूला लाजवेल अशा जिद्दीने पूर्ण केला. यापूर्वीही श्रावणने आपल्या सातव्या वाढदिवशी सायकलने 100 किमी अंतर पार करून असाच विक्रम केला होता. त्याच्या या कामगिरीची दखल घेत आतापर्यंत दोनदा त्याला डेपॅथलॉन आणि आदित्य ग्रुपतर्फे दोनदा ‘यंगेस्ट पार्टीसिपंट’ म्हणून गौरविण्यात आले आहे.
श्रावणच्या या प्रवासात त्याचे वडील अविनाश मोरे आणि महाराष्ट्र ट्रेकर असोसिएशन पनवेलचे अध्यक्ष धनंजय मदन आणि मॅरेथॉनपटू बाबू रामस्वामी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.


























































