रेल्वे प्रवाशांना पुढच्या वर्षी सुखद ‘धक्का’!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

रेल्वे प्रवासात आतापर्यंत धक्के खाणाऱया प्रवाशांना पुढच्या वर्षी एक सुखद धक्का बसणार आहे. सर्व वाहतूक सेवांना एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणत सिंगल तिकीट योजनेची सुखद भेट मुंबईकरांना देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

परळ टर्मिनससह विविध रेल्वे सुविधांचे उद्घाटन रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे झाले त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पूर्वी रेल्वे बजेटमध्ये एखादा प्रकल्प आला तरी आपण खूप मोठा आनंद साजरा करायचो. मग प्रत्यक्ष प्रकल्पाला 20 वर्षे लागायची. परंतु देशाच्या इतिहासात इतक्या कमी वेगात इतकी मोठी कामे झाली नाहीत. एमयूटीपी-3 आणि 3 (अ)साठी 55 हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. महाराष्ट्राने जितक्या मागण्या केल्या तितक्या रेल्वेमंत्र्यांनी पूर्ण केल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याच्या डबल इंजिनाने गेल्या 60 वर्षांत झाला नव्हता इतका वेगवान विकास पाच वर्षांत झाला असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या भाषणात सांगितले. यापूर्वी मुंबई उपनगरातून फायदा मिळत नसल्याचे कारण दिले जात होते, परंतु मोदींनी देशाची एक तृतीयांश लोकसंख्या मुंबईच्या लोकलमधून प्रवास करते हे जाणून नफ्यातोटय़ाचा विचार न करता सढळ हस्ते केंद्राने विकासकामे केली आहेत. सध्या उपनगरीय रेल्वेची पायाभूत विकासासाठी 20 हजार कोटींची कामे सुरू असून 55 हजार कोटींच्या प्रकल्पांना केंद्र व राज्यांनी मंजुरी दिल्याचेही गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे, प्रा. रवींद्र गायकवाड, किरीट सोमय्या, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, कपिल पाटील, राज पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.
चिखलोली स्थानकाला मंजुरी

अंबरनाथ आणि बदलापूरदरम्यान नव्या चिखलोली स्थानकाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

कल्याण ते मुरबाड रेल्वे मार्ग
कल्याण ते मुरबाडदरम्यान 28 कि.मी.च्या नव्या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली. 2023 पर्यंत तो पूर्ण होणार.

अलिबाग-पेण रेल्वेमार्ग
अलिबाग आणि पेणदरम्यान सध्या मालगाडय़ांचा मार्ग आहे. त्यावर स्थानके बांधून पॅसेंजर ट्रेन चालविण्यासाठी आरसीएफशी चर्चा सुरू आहे.

सोलापूर-तुळजापूर-धाराशीव रेल्वेमार्ग
तुळजा भवानी मंदिराला रेल्वेमार्गाने जोडणाऱया 84.44 कि.मी. रेल्वे मार्गावर आठ स्थानके असणार असून 905 कोटी रुपयांचा प्रकल्प 2023 रोजी पूर्ण होणार आहे.