मुंबईसह सहा जिह्यांतील रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडिट पूर्ण

>> मनोज मोघे

राज्यातील काही रुग्णालयांत ऑक्सिजन गळतीच्या घटना झाल्यानंतर राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करीत या रुग्णालयांचे ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार तंत्र शिक्षण संस्थांकडून मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, संभाजीनगर या सहा जिह्यांतील 335 सरकारी आणि 1479 खासगी रुग्णालयांचे ऑडिट पूर्ण करण्यात आले. यामध्ये 254 सरकारी तर 1465 खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन प्रणालीबाबत त्रुटी आढळून आल्या आहेत. सरकारी रुग्णालयांतील याविषयीच्या त्रूटी दूर करण्यात आल्यास असून खासगी रुग्णालयांना नोटीस पाठवून या त्रूटी दूर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱयांमार्फत देण्यात आले.

ऑक्सिजनचा अपुरा असणारा पुरवठा तसेच ऑक्सिजन गळतीसारख्या दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांना नोडल ऑफिसर नियुक्त केले. या संचालनालयाने तातडीने तंत्र शिक्षण संस्थाना प्रत्येक जिह्याशी संपर्क साधून ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार रुग्णालयांतील ऑक्सिजन सिलिंडरची साठवणूक, सुरक्षितता, वायुनलिकांची व ऑक्सिजन प्राणालीची देखल याची पाहणी करण्यात आली. या वायुनलिकांची नियमित तपासणी केली जात आहे का? यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ आहे का आदी बाबीही तपासण्यात आल्या.

या त्रुटी आढळल्या!

ऑक्सिजन वायुनलिका तसेच ऑक्सिजन सिलिंडरच्या व्हॉल्व्हमध्ये लीकेज झाल्याचे आढळून आले. अनेक रुग्णालयांत ऑक्सिजन साठविण्याच्या ठिकाणी अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणीच करण्यात आली नसल्याचे दिसून आले. ऑक्सिजन सिलिंडर साठवणुकीच्या जागेत अडगळीचे साहित्य, तसेच काही ठिकाणी या जागेजवळच विजेचा ट्रान्सफॉर्मर किंवा एखादे झाड, त्याचप्रमाणे सिलिंडर साठविण्यासाठी योग्य शेडच नसल्याचे दिसून आले. ही यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी आवश्यक साहित्य तसेच मनुष्यबळच नसल्याचेही आढळून आले. तर नंदुरबार जिह्यातील दुर्गम डोंगरी भागातील रुग्णालयांत ऑक्सिजन प्रणालीच नसल्याचा अहवाल या यंत्रणेने दिला आहे.

ऑक्सिजनची बचत

अहवालानुसार तत्काळ त्रुटी दूर करून सरकारी रुग्णालयांतील ऑक्सिजन यंत्रणेची दुरुस्ती करण्यात आली. यामुळे मोठय़ा प्रमाणावर ऑक्सिजनची बचत झाली आहे. खासगी रुग्णालयांना नोटीस पाठवून ही यंत्रणा दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या