Mumbai ऐवजी लिहिले Mumabai, चूक पडली 10 लाख रुपयांना

मुंबई विद्यापीठाच्या प्रमाणपत्रावर Mumbai ऐवजी Mumabai अशी स्पेलिंग मिस्टेक करण्यात आली होती. आता ही चूक 10 लाख रुपयांना पडणार आहे. विद्यापीठ प्रशासन ही चूक करणाऱ्या कंत्राटदाराला 10 लाख रुपयांचा दंड ठोठवणार आहे.

हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. विद्यापीठातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण टेंडरच्या खर्चाच्या 20 टक्के रकमेइतका किंवा 10 लाख रुपये एवढा दंड संबंधित छपाई करणाऱ्या कंत्राटदारावर लावण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या सिनेट सदस्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत विद्यापीठ प्रशासनाने या चुकांवर आधारित अंतर्गत चौकशी अहवाल सादर केला.

या वर्षाच्या सुरुवातीलाच पदवी वितरण समारंभापूर्वी अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्रमाणपत्रांमध्ये ‘Mumbai’ ऐवजी चुकून ‘Mumabai’ असा उल्लेख होता. त्यामुळे विद्यापीठाला हे सर्व प्रमाणपत्रे मागे घेऊन पुन्हा छापावी लागली होती.

विद्यापीठाने मंजूर केलेल्या प्रूफमध्ये ‘Mumbai’ बरोबर लिहिले होते, पण विद्यार्थ्यांना पाठवलेल्या छापील प्रतींमध्ये चूक झाली. त्यामुळे दोष फक्त छपाई करणाऱ्या कंपनीचा आहे असे प्रशासनाने सादर केलेल्या अहवालात सांगण्यात आले आहे.

परंतु सिनेट सदस्य सदस्य शीतल देवरुखकर-शेठ यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी वाचून दाखवलेल्या अहवालात विद्यापीठ दोषी नसल्याचे म्हटले आहे. आणि संपूर्ण चूक छपाई करणाऱ्यांवर ढकलली गेली. आम्ही अहवालाची प्रत मागितली, पण ते ‘गोपनीय’ असल्याचं सांगण्यात आम्हाला हा अहवाल दिला नाही. तसेच छपाई करणाऱ्यांवर कारवाई करणे पुरेसे नाही. प्रक्रिया हाताळणाऱ्या विद्यापीठातील अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.