मुंबईबाहेरून येणाऱया रुग्णांसाठी टाटा रुग्णालय उभारतेय धर्मशाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गरिबीमुळे उपचारांना पैसे नाहीत तर मुंबईसारख्या शहरात भाडय़ाने राहणार कसे? उपलब्ध व्यवस्थाही त्यांच्यासाठी अपुरी पडते. त्यामुळे मुंबईबाहेरून उपचारासाठी येणाऱया शेकडो रुग्णांना फुटपाथशिवाय पर्याय नसतो. अशा रुग्णांना दिलासा देण्यासाठी टाटा रुग्णालयाच्या वतीने परळ येथे राज्य सरकारने दिलेल्या जागेवर धर्मशाळा उभारली जात आहे. येत्या 18 महिन्यांमध्ये या धर्मशाळेचे बांधकाम पूर्ण होईल आणि तिथे 300 रुग्णांच्या राहण्याची व्यवस्था होईल.

टाटा रुग्णालय गेली 80 वर्षे कर्करुग्णांवर उपचारांची सेवा देत आहे. कर्करोगाविरुद्धच्या लढाईत परळचे टाटा रुग्णालय देशात आघाडीवर आहे. देशभरातूनच नव्हे तर जगभरातून रुग्ण तिथे उपचारासाठी येतात. मुंबईबाहेरून येणाऱया रुग्णांना राहण्याची व्यवस्था नसते. रुग्णालयाच्या वतीने वांद्रे येथील बोर्जेस मेमोरियल होम आणि वडाळा येथील सेंट ज्यूड चाईल्ड केअर येथे निवासाची व्यवस्था आहे, परंतु रुग्णसंख्येच्या मानाने ती कमी पडते. निवासाची गरज असलेल्या केवळ 50 टक्के रुग्णांनाच तिथे समाविष्ट करता येऊ शकते.

मुंबईत भाडय़ाने राहायचे तर रुग्णांना भाडे परवडणारे नसते. प्रवास आणि जेवणावरही त्यांचा मोठा खर्च होतो. अशा रुग्णांच्या सोयीसाठी राज्य सरकारच्या वतीने नुकतेच म्हाडाचे 100 गाळे देण्यात आले. त्याबद्दल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे आणि उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे आभार मानले आहेत.