मुंबईचा पारा पुन्हा 13 अंशांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जानेवारीच्या सुरुवातीला मुंबईकरांना हुडहुडी भरवून गायब झालेली थंडी महिना सरताना पुन्हा शहरात दाखल झाली आहे. उपनगरांबरोबरच शहर भागातही पाऱयाच्या पातळीत अचानक 6 अंशांची घट झाली. कुलाब्यात किमान तापमान 13.8 अंशांवर घसरले, तर कमाल तापमानात 3 अंशांची घट झाली. त्यामुळे पहाटे कुडकुडत उठलेल्या मुंबईकरांनी शुक्रवारी संपूर्ण दिवसभर गारवा अनुभवला.

सांताक्रूझमध्येही कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानांत तीन अंशांची घसरण झाली. बोरिवली आणि पवईमध्ये सर्वात कमी 13.3 अंश तापमान होते. उत्तरेकडील थंड वारे पुन्हा मुंबईच्या दिशेने वाहू लागले आहेत. त्यामुळे शहरात पुढील काही दिवस थंडीचा जोर वाढलेलाच राहील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.