
मुंबईतील नाटय़गृहे पुढील वर्षापासून सौरऊर्जेवर लखलखणार असून त्यामुळे होणाऱया वीज खर्चातील बचतीमुळे रसिक प्रेक्षकांना परवडणाऱया दरात नाटक पाहता येऊ शकेल. मुंबईतील नाटय़गृहांत सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यात यावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. त्याला पालिकेने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मुंबईत विजेची मागणी आणि विजेचे दर सतत वाढत आहेत. विजेला स्वस्त पर्याय म्हणून सौरऊर्जेकडे पहिले जाते. विविध देशांत सौरऊर्जेचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील नाटय़गृहांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबवले तर त्याचा फायदा रसिक प्रेक्षकांनाही होणार आहे. त्यामुळे वीज खर्चात बचत होऊन नाटय़निर्मात्यांना माफक दरात नाटय़गृहे उपलब्ध होऊ शकतात. राज्यातील अनेक खेडय़ांमधील नाटय़गृहांमध्ये अशाप्रकारे सौरऊर्जेचा प्रयोग सुरू असून त्याचा फायदा रसिकांना होत आहे. त्या धर्तीवर मुंबईतील नाटय़गृहांत सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात यावी अशा ठरावाची सूचना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महासभेत मांडली होती. तसेच वीज खर्चात बचत, नाटय़निर्मात्यांना कमी खर्चात नाटय़निर्मिती करता येईल आणि रसिक प्रेक्षकांना परवडणाऱया दरात नाटके पाहता येतील असे त्या म्हणाल्या. महासभेने 27 जूनला या सूचनेला मंजुरी देऊन आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवली होती. प्रशासनाने यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सौरऊर्जा प्रकल्पाचे आयुष्यमान सुमारे 25 वर्षे असते. मुंबईतील विविध नाटय़गृहांत यामुळे सौरऊर्जा प्रकल्प राबविणे शक्य आहे. मात्र संबंधित इमारतींची पाहणी करून सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याचा निर्णय घेतला जाईल. सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी 2020-21 च्या आर्थिक वर्षात भरीव तरतूद करून आगामी वर्षापासून कामाला सुरुवात केली जाईल. असे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितले.


























































