मुंबईतील पर्यटनस्थळांच्या संवर्धनासाठी निधी तत्काळ उपलब्ध करून द्या! अजित पवार यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहराचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता या शहरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी यावेळी दिले तर पर्यटन विकासाच्या दृष्टीने शहरातील 22 महत्त्वाच्या ठिकाणांना प्राधान्य देऊन त्यांचा विकास करण्यात येईल, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मुंबईतील पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर–सिंह, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसराचा कलात्मकदृष्टय़ा विकास करण्याच्या अनुषंगानेही सादरीकरण करण्यात आले. या परिसराचा हेरिटेज दर्जा कायम राखून त्याचा विकास करण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यासाठी आवश्यक निधी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

  • मुंबई शहराचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता इथली पर्यटनस्थळे त्याच दर्जाची करण्याची पर्यटन विभागाची योजना आहे. शहरातील 22 प्रमुख पर्यटनस्थळांचे प्राधान्याने जतन, संवर्धन आणि विकास केला जाईल, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. बॉलीवूड संग्रहालय, क्रिकेट संग्रहालय आदींचीही निर्मिती करण्याचे नियोजन आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या संवर्धन आणि परिसर विकासासाठी नियोजन केले असून त्याचा आराखडा बनविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई शहरातील पर्यटनस्थळांच्या विकासासंदर्भात प्रशासकीय आणि इतर कार्यवाही निश्चित वेळेत करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.