
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कोमेजलेले जम्मू-काश्मीरमधील पर्यटन पुन्हा एकदा बहरत आहे. पर्यटकांना भुरळ घालणारी खोऱ्यातील अनेक स्थळे पुन्हा खुणावत आहेत. तेथील सरकार पर्यटकांना सुरक्षित वाटेल अशी अनेक पावले उचलत आहे. त्याबाबत आश्वस्त करत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज मुंबईकर पर्यटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जम्मू-काश्मीरचे पर्यटन प्रत्येक संकटानंतर मुंबई-महाराष्ट्रातील पर्यटकांनीच सावरले, असे ते म्हणाले.
पर्यटन हा जम्मू-काश्मीरचा आर्थिक कणा आहे. 90 नंतर पर्यटन ठप्प झाले होते. ‘बूंद बूंद से सागर बनता है’ याप्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्र आमच्यासाठी आधार बनला. येथील पर्यटकांनी खोऱ्यातील पर्यटनाला नवसंजीवनी दिली. राज्यावर अनेक संकटे आली; त्या प्रत्येक संकटानंतर जी नवी सुरुवात झाली ती मुंबईने करून दिली, असे सांगत ओमर अब्दुल्ला यांनी पर्यटकांना जम्मू-काश्मीरची वाट दाखवणाऱ्या राजा-राणी ट्रव्हल्सचे आभार मानले.
…म्हणून पक्ष पळवण्यापर्यंत मजल!
आज पक्ष माझ्यासाठी सर्वकाही असतो आणि पुढच्या 24 तासांत पक्षात काहीच चांगलं नाही अशी मी भूमिका घेतो—इतक्या खालच्या थराला राजकारण गेले आहे. पूर्वी केवळ पक्षांतर व्हायचे, आता पक्षच पळवले जात आहेत, याकडे लक्ष वेधले असता हा पक्षांतर बंदी कायद्यातील त्रुटींचा परिणाम आहे, असे ते म्हणाले.
कोस्टल रोड, सी-लिंकचे कौतुक
हिमाचलमध्ये मी तीन वर्षे वास्तव्य केले. मुंबईत तीन वर्षे कॉलेजमध्ये होतो. त्यामुळे माझ्यासाठी दुसरे घर हिमाचल तर तिसरे घर मुंबई आहे. मुंबईतले सगळे रस्ते मला तोंडपाठ होते; मात्र कोस्टल रोड, सी-लिंकने रूपडेच पालटले आहे, असे कौतुक ओमर यांनी केले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. कोणताही व्यापार, गुंतवणूक मुंबईशिवाय होऊच शकत नाही. पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीनेही आमचे सर्वात मोठे मार्केट मुंबईच आहे. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही शहरात नाही गेलो, तरी मी मुंबईत वर्षातून किमान दोनदा येतोच, असे ओमर म्हणाले.





























































