मुंबई उपांत्य फेरीच्या दिशेने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हार्दिक तामोरेच्या 114, पृथ्वी शॉच्या तडाखेबंद 87, शम्स मुलानीच्या 54 आणि तनुष कोटियन (32) व तुषार देशपांडे (23) यांनी दहाव्या विकेटसाठी 42 धावांच्या भागीमुळे मुंबईने बडोद्याविरुद्धच्या रणजी करंडकाच्या सामन्यात चौथ्या दिवसअखेर दुसऱया डावात 9 बाद 379 अशी मजल मारत आपला उपांत्य फेरीतील प्रवेश जवळजवळ निश्चित केला आहे. पहिल्या डावातील 36 धावांच्या माफक आघाडीमुळे मुंबईची धावांची आघाडी 415 झाली असून पाचव्या दिवशी बडोद्याला हे आव्हान गाठणे कठीण असल्यामुळे मुंबई-तामीळनाडू या उपांत्य लढतीचे आतापासूनच वेध लागले आहेत.

मुंबईच्या दिवसभरात 358 धावा
काल दिवसअखेर 1 बाद 21 अशा स्थितीतून आपली फलंदाजी सुरू करणाऱया मुंबईसाठी आज त्यांच्या फलंदाजांनी 90 षटकांत 358 धावा चोपून काढल्या. कालची नाबाद जोडी आज दुसऱयाच षटकात बाद झाली. अवघ्या एका धावेची भर घातल्यानंतर नाइट वॉचमन मोहित अवस्थी बाद झाला. मात्र त्यानंतर हार्दिक तामोरे आणि मुशीर खानने ( 33) तिसऱया विकेटसाठी 66 धावांची भर घातली. मग पृथ्वी शॉबरोबर चौथ्या विकेटसाठी 124 धावांची झंझावाती भागी रचली. या भागीमुळेच मुंबईच्या धावांचा वेग चारच्या पुढे गेला. पृथ्वीने चौकार-षटकारांनी एमसीएचे मैदानही दणाणून सोडले. तो आपले झंझावाती शतक पूर्ण करणार असे वाटत असतानाच तो बाद झाला. त्याने 93 चेंडूंत 87 धावा काढल्या. मग तामोरेने आपले तिसरे शतक झळकवले. तळाला शम्स मुलानी आणि कोटियन-देशपांडेने चांगली फलंदाजी करत संघाची आघाडी 400 पार नेली. मुंबईच्या नऊपैकी सात फलंदाजांना भार्गव भट्टने बाद केले. चौथ्या दिवसअखेर 415 धावांची आघाडी असल्यामुळे मुंबईची उपांत्य फेरी निश्चित मानली जात आहे. तसेच तामीळनाडूने सौराष्ट्रचा कालच डावाने दारुण पराभव केला होता. त्यामुळे मुंबईतच उपांत्य सामनाही खेळला जाण्याची शक्यता आहे.