
मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सभेमध्ये ठराव मंजूर होऊनही कल्याण उपकेंद्राला दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे नाव अद्याप दिलेले नाही. प्रशासन मुद्दामहून टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने कल्याण उपकेंद्रावर धडक देऊन प्रशासनाला धारेवर धरले. पुढील दोन दिवसांत धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचा फलक लावण्यात आला नाही तर शिवसेना, युवासेनेच्या वतीने नामकरण सोहळा केला जाईल, असा इशारा युनिव्हर्सिटीच्या ढिम्म प्रशासनाला दिला.
मुंबई विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राच्या कामकाजात गंभीर त्रुटी असून उद्घाटन होऊनही कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. त्यामुळे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेना शिष्टमंडळाने या उपकेंद्राला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. शिष्टमंडळामध्ये सिनेट सदस्या शीतल देवरुखकर, प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांचा समावेश होता. पाहणीदरम्यान अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. उपकेंद्राच्या उद्घाटनाला बराच काळ उलटूनही आजवर कोणतीही ठोस शैक्षणिक वा प्रशासकीय प्रगती झालेली नाही.
स्वच्छतेचा बोजवारा
कायमस्वरूपी केंद्रप्रमुखाची नेमणूक झालेली नाही. सध्या ठाणे महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडेच अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. इतकेच नव्हे तर इतक्या मोठ्या शैक्षणिक संकुलासाठी केवळ एकच स्वच्छता कर्मचारी कार्यरत असून स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. याबाबत शिष्टमंडळाने प्रशासनाकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.