कुत्र्याच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक

भटक्या कुत्र्याची हत्या केल्या प्रकरणी चौघांना वर्सोवा पोलिसांनी अटक केली. यासिन माणियार, अरविंद कुमार यादव, राज विरेदर सिंग, सुनील जयसिंग अशी त्याची नावे असून न्यायालयाने त्या चौघांची जामिनावर सुटका केली. वर्सोवा परिसरात एक सोसायटी आहे. त्या सोसायटीजवळ एक भटके कुत्रे काहींना चावले होते. त्यामुळे सोसायटीच्या सेक्रेटरीने दोघांना पाच हजार रुपये देऊन कुत्र्याला लांब सोडून येण्यास सांगितले होते. 12 फेब्रुवारीला दोघे जण हे रिक्षातून सोसायटीजवळ आले. त्या कुत्र्याला रिक्षातून नेऊन त्याची हत्या केली. कुत्र्याला खाडीत टाकून त्या दोघांनी पळ काढला होता. बरेच दिवस कुत्रा दिसत नसल्याने एका श्वान प्रेमीने एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकाकडे विचारपूस केली. तेव्हा त्याने दोन जण रिक्षातून आले, त्याने कुत्र्याला नेल्याचे श्वान प्रेमीला सांगितले. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. सहायक निरीक्षक सोहम कदम यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यावरून पोलिसांनी रिक्षा चालकांना शोधून काढले. कुत्र्याच्या हत्येप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी चौघांना अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या