वीरमाता जिजाऊ, बाल शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर मेघडंबरी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या भायखळा येथील उद्यान व प्राणिसंग्रहालयातील वीरमाता जिजाबाई भोसले आणि बाल शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर लवकरच मेघडंबरी उभारण्यात येणार आहे. आकर्षक डिझाईन आणि हेरिटेज लूक असलेल्या या मेघडंबरीमुळे पुतळ्याची शोभा आणखी वाढणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 1998 मध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

मेघडंबरी उभारण्याबाबत सर्व प्रशासकीय परवानग्या मिळाल्यामुळे आता निविदा मागवल्याचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.

या पुतळ्यावर जमिनीपासून सुमारे दोन मीटर उंचीवर ब्राँझ धातूपासून बनवलेली मेघडंबरी उभारण्यात येणार आहे. नागफणाच्या स्वरूपात आणि हेरिटेज लूक असलेली मेघडंबरी असेल. यामध्ये सिव्हिल काम धरून या संपूर्ण कामासाठी सुमारे 38 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.

ब्राँझची मेघडंबरी उभारणार

वीरमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराजांचा सुमारे सव्वा मीटरचा हा पुतळा आहे. जिजाऊ आणि शिवरायांचा मूळ पुतळा शिल्पकार विठ्ठल शानभाग यांनी बनवला आहे. हा पुतळा ब्राँझपासून बनवण्यात आला आहे. तर आता हेरिटेज सल्लागार राहुल चेंबूरकर यांनी या मेघडंबरीचे डिझाईन केले आहे.