
मुंबईत विधान भवनाच्या लॉबीत जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार मारामारी झाली होती. याप्रकरणी आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख व पडळकरांचा कार्यकर्ता सर्जेराव टकले या दोघांना दोन दिवसांची दिवाणी कारावासाची शिक्षा तसेच 2029 पर्यंत विधान मंडळ प्रवेशास मनाईची शिफारस विधानसभा विशेषाधिकार समितीने केली आहे. त्याशिवाय विधान भवनातील अभ्यागतांसाठी नियमावलीची शिफारस केली आहे.
मुंबईतील पावसाळी अधिवेशनात 17 जुलै 2025 रोजी विधान भवनाच्या लॉबीत जितेंद्र आव्हाडांचा समर्थक नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांचा समर्थक सर्जेराव टकले यांच्यातील शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर धक्काबुक्कीत आणि जोरदार मारामारीत झाले. या घटनेमुळे विधिमंडळ परिसरात मोठी खळबळ उडाली होती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेत विशेषाधिकार समितीकडे चौकशीसाठी पाठवले होते. या विशेषाधिकार समितीने याप्रकरणी एकूण 10 बैठका घेत साक्षीपुरावे तपासले. नितीन देशमुख, सर्जेराव टकले यांच्यासह इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सीसीटीव्ही फुटेज, प्रवेशपत्रिका वितरण रजिस्टर आदी पुराव्यांची पडताळणी केली. विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष नरेंद्र भोंडेकर यांनी आज सभागृहात अहवाल सादर केला.
या समितीने नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांना विधान भवनाच्या विशेषाधिकाराचा भंग केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. त्यांना प्रत्येकी दोन दिवसांची दिवाणी कारावासाची शिक्षा आणि मुंबई तसेच नागपूर येथील विधान भवन परिसरात 31 डिसेंबर 2029 पर्यंत प्रवेशबंदी करण्याची शिफारस केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत फ्री स्टाईल मारामारी झाली होती, पण या समितीने या दोन आमदारांबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.
व्हिजिटर्सचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासणार
समितीने विधान भवनातील सुरक्षेबाबतही शिफारशी केल्या आहेत. यात अभ्यागतांना प्रवेश देण्याकरिता स्वतंत्र नियमावली करावी, प्रवेश पास वितरण प्रणाली ही महाराष्ट्र पोलीस डेटाबेसशी थेट जोडावी, जेणेकरून गुन्हेगारी रेकॉर्ड समजेल, संसदेच्या धर्तीवर विधान भवनाची सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम करावी आणि पास वितरण प्रणाली तंत्रज्ञान तज्ञांच्या सल्ल्याने आधुनिक आणि सुरक्षित बनवावी या शिफारशींचा समावेश आहे.

























































