
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्य़ा आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातच असणाऱ्य़ा दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ आज सकाळी 9 वाजता भरुन वाहू लागला आहे.
27,698 दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव वर्ष 2019 मध्ये 31 जुलै रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच वर्ष 2018 मध्ये दिनांक 16 जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता. बृहन्मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्य़ा तलावांपैकी विहार तलाव हा सर्वात लहान 2 तलावांपैकी एक असून यापैकी दुसरा तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. विहार तलावातून दररोज सरासरी 9 कोटी लीटर एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.































































