
विक्रोळी येथील कन्नमवार नगरातील म्हाडा वसाहतीमध्ये गेली 40 वर्षे जीव मुठीत घेऊन राहणाऱया 411 कुटुंबांना शिवसेनेमुळे आज हक्काची घरे मिळाली. शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या घरांच्या चाव्या त्यांना सुपूर्द करण्यात आल्या. शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असून या रहिवाशांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
कन्नमवारमधील म्हाडाच्या या संक्रमण शिबिरांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे रहिवासी भयभीत झाले होते. सुनील राऊत यांनी 2014 मध्ये आमदार होताच या रहिवाशांना हक्काची घरे मिळवून देण्याचा पण केला होता. त्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला आणि त्यांचे प्रयत्न यशस्वी झाले. संक्रमण शिबिरातील एकाही रहिवाशाला बाहेर पाठवायचे नाही असा सुनील राऊत यांचा हट्ट होता आणि त्यांनी ते करून दाखवले असे याप्रसंगी म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर म्हणाले. युवासेना सचिव वरुण सरदेसाई, ईशान्य मुंबई समन्वयक संजय पाटील, विभाग संघटक संध्या वढावकर, विभागप्रमुख रमेश कोरगावकर, माजी महापौर दत्ता दळवी, माजी आमदार अशोक पाटील, नगरसेवक उपेंद्र सावंत, सुवर्णा करंजे, राजराजेश्वरी रेडकर, उपविभाग संघटक चंद्रशेखर जाधव, अनंत पाताडे, धर्मनाथ पंत, विभाग संघटक परम यादव, संदीप सावंत, नीलेश साळुंखे, उपविभाग संघटक रश्मी पहुडकर, सिद्धी जाधव, स्नेहल मांडे, विजय सोनमळे आदी उपस्थित होते.
इतर पक्ष चाव्या मारतात, शिवसेना चाव्या वाटप करते – आदित्य ठाकरे
शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या रहिवाशांना चाव्या सुपूर्द करतानाच सुनील राऊत यांच्या कार्याची प्रशंसा केली. ‘इतर पक्ष चावी मारण्याचे काम करतो, पण शिवसेना चावीवाटपाचे काम करते. फक्त विक्रोळी किंवा महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश आपला बालेकिल्ला झाला पाहिजे असे काम आपल्याला करायचे आहे.’ असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. सामाजिक कामासाठी कधीही हाक मारा, मी तत्पर असेन, असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे कामच पालिकेवर स्वबळावर सत्ता आणेल – संजय राऊत
‘शिवसेना व महाविकास आघाडी सरकार काय काम करते असे विचारणाऱयांना यातील 412 वी चावी द्या म्हणजे त्यांना समजेल’ असे याप्रसंगी बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले. शिवसेनेचे हे काम पाहता महापालिकेवर स्वबळावर एकहाती सत्ता आणणे कठीण नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात काम करण्याची चावी शिवसेनेकडे असल्याने गोरगरीबांचे कुठलेही काम थांबणार नाही, असे ते म्हणाले.
विक्रोळी विधानसभेत सर्व नगरसेवक शिवसेनेचे असतील – सुनील राऊत
आमदार सुनील राऊत यांनी यावेळी आदित्य ठाकरे यांचे आभार मानले. आगामी निवडणुकीत विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील सर्व नगरसेवक हे शिवसेनेचे असतील असे वचन देण्यासाठी तुम्हाला या चावीवाटप कार्यक्रमाला आमंत्रित केले, असे सुनील राऊत यावेळी म्हणाले.




























































