हवामान खात्याचे ‘अति’ होतेय! आता म्हणे 24 तासांत मुंबई, ठाण्यात अतिवृष्टी

1226

मुंबईसह उपनगरांत, ठाण्यात आणि राज्यभरात अनेक भागांत अतिवृष्टी होईल, असा इशारा मंगळवारी दिल्यानंतर संपूर्ण बुधवार कोरडा गेला. त्यामुळे हवामान खाते चक्रावून गेले. मात्र आता येत्या 24 तासांत पुन्हा हवामान खात्याने मुंबई, ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आता तर त्यांचे अतिच झालेय, अशी प्रतिक्रिया मुंबईकरांकडून येत आहे. दरम्यान, आज शुक्रवारी मुंबई, ठाण्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. उपनगरात काही ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली.

अरबी समुद्रातून आर्द्रतायुक्त वारे मुंबईच्या दिशेने वाहत असल्याने मुंबईत दिवसभर ढगाळ वातावरण होते. अधूनमधून तर अक्षरशः अंधारून येत होते. मुसळधार पाऊस झाला नसला तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

…म्हणून मुसळधार पावसाचा अंदाज
अरबी समुद्रात दक्षिण गुजरातपर्यंत तसेच ओडिशापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, तर मध्य महाराष्ट्रावर सायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झाल्याने आज मुंबईसह राज्यभरात अनेक भागांत पाऊस पडत आहे. कमी दाबाचे क्षेत्र आणखी गडद होऊन पुढच्या 24 तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

संपूर्ण सप्टेंबर पाऊस सक्रिय राहणार
सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात पाऊस राज्यभरातून काढता पाय घेतो; परंतु यंदा पावसाचा नूर काही वेगळाच आहे. सप्टेंबरचा तिसरा आठवडा उजाडला तरीही तो गायब होण्याचे नाव घेत नाहीय. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पाऊस सक्रिय राहणार असल्याचे ‘स्कायमेट’चे महेश पलावत यांनी सांगितले.

समुद्रात वारे ताशी 60 कि.मी. वेगाने वाहणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत 2 आणि पूर्व उपनगरात 1 अशा 3 ठिकाणी शुक्रवारी झाडे कोसळण्याच्या तक्रारी आल्या.

दिवसभरातील पाऊस (मि.मी.)
शहर – 40.66 मि.मी.
पूर्व उपनगर – 22.83 मि.मी.
पश्चिम उपनगर – 26.41 मि.मी.
कुलाबा – 43.6 मि.मी.
सांताक्रुझ – 40.0 मि.मी.

आपली प्रतिक्रिया द्या