मुंबईमध्ये जोरदार पाऊस, ठाणे आणि नवी मुंबईतही संततधार

1082

मुंबईच्या अनेक भागांमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून तुफानी पावसाला सुरुवात झाली आहे. निसर्ग वादळामुळे बुधवारी मुंबईत दिवसभर पाऊस पडला होता. या पावसाने रात्री विश्रांती घेतली होती. पूर्व उपनगरातील विक्रोळी, भांडूप, मुलुंड परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सीएसटी, दादर, वरळी परिसरातही पावसाची संततधार सुरू झाली आहे.

गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून पूर्व उपनगरांत आकाशात काळे ढग जमायला लागले होते. 8 वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली. पावसाची तीव्रता ही बुधवारच्या तुलनेत जास्त असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. बुधवारपासून पडत असलेल्या या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून मुंबईकर यामुळे सुखावले आहेत.

मुंबईप्रमाणेच ठाणे, नवी मुंबई इथेही सकाळपासूनच पाऊस पडत आहे. निसर्ग वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बुधवारपासून कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडत आहे. खरंतर मुंबईमध्ये मॉन्सूनचे आगमन 8 जूनला होणार आहे. मात्र त्याआधीच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर उद्याही कायम असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या