अपारंपरिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्यात महाराष्ट्र आघाडीवर!

166

अपारंपरिक म्हणजे सौर आणि पवन ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या दोन वर्षात तब्बल 9 हजार 700 मेगावॅट म्हणजे 9.7 गिगावॅट क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारले आहेत. तर कर्नाटकने सुमारे साडेसहा हजार मेगावॅट, आंध्र प्रदेशने 5500 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प उभारले असल्याचे एनर्जी इन्स्टिटय़ूट ऑफ इकनोमिकने आपल्या अहवालात म्हटले आहे.

केंद्र सरकारने 2022 पर्यंत एक लाख 75 हजार (175 गिगावॅट) क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभरण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने 2018 पासून 2022 पर्यंत 22 हजार मेगावॅट (22 गिगावॅट) ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत नियोजन केले आहे. त्यानुसार आतापर्यंत 9 हजार 700 मेगावॅट क्षमतेचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारले असून त्यामध्ये मोठय़ा क्षमतेचे सौर प्रकल्प, मुख्यमंत्री सौर कृषी योजनेंतर्गत बसवलेले कृषी पंप, रुफ टॉप सोलर आणि पावन ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. दरम्यान अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज वितरण कंपन्यांना त्यांच्या एकूण वीज वितरणाच्या 15 टक्के वीज अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पातून घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभरण्याला प्रोत्साहन मिळाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या