
गेले चार-पाच दिवस पहाटेसह दिवसाच्या हवेत गारवा होता. त्यामुळे मुंबईकर सुखावले होते. काहींनी रविवारची सुट्टी आणि सोबतीला थंडी हा योग साधून पाटर्य़ांचा बेतही पक्का केला होता. मात्र ढगाळ वातावरणाने हा बेतही फिस्कटून लावला. पहाटे हुडहुडी नाही आणि सकाळच्या सुमारास कोवळे ऊनही नाही अशा विचित्र वातावरणात मुंबईकरांच्या हक्काच्या सुट्टीचा रविवार उजाडला होता. पुढे संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरणाच्या ‘डोकेदुखी’ला मुंबईकरांना तोंड द्यावे लागले. सांताक्रुझमध्ये सरासरीपेक्षा 4.2 अंशांनी अधिक म्हणजे 22.2 अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली, तर कुलाब्यात 22.8 अंश तापमान नोंद झाले. हे तापमान सरासरीपेक्षा 2.4 अंशांनी अधिक होते.
लक्षद्वीपच्या आसपास कमी दाबाचा पट्टा
अरबी समुद्रात लक्षद्वीपच्या आसपास कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईतील थंडीचे तीनतेरा वाजले आहेत. या पट्टय़ाचा प्रभाव हवेतील आर्द्रतेवर विसंबून आहे. पुढील दोन-तीन दिवस पट्टा कायम राहिल्यास किमान तापमान चढेच राहील.
पाच वर्षांतील तिसरी किमान तापमानवाढ
रविवारी पहाटे कुलाब्यात किमान तापमानाने गाठलेली 22.8 अंशांची पातळी ही गेल्या पाच वर्षांतील चौथ्या क्रमांकाची तापमानवाढ ठरली आहे. या आधी 2016 मध्ये 23.6 अंश इतके सर्वाधिक किमान तापमान नोंद झाले होते.




























































