
सामना ऑनलाईन । नवी मुंबई
आजकाल फोनवरून बँकेची माहिती मागवून फसवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपल्याला नेहमीच ओटीपी, पासवर्ड, अकाऊंट नंबर सांगू नका अशा आशयाचे संदेश हे येत असतात. पण काही जण भोळेपणामुळे किंवा मग कधी कधी मुर्खपणामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि आपली महत्त्वाची खासगी माहिती इतरांना सांगून मोकळे होतात. अशीच काहीशी घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे. नेरुळ येथे राहणाऱ्या एका महिलेने एक-दोन नव्हे तर आठवडाभरात २८ वेळा आपला ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) फोनवर सांगणं चांगलच महागात पडलं आहे. महिलेच्या अकाउंटमधील तब्बल सात लाखांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तसनीम मुज्जकर मोडक असे या महिलेचे नाव असून तिला १७ मे रोजी एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने महिलेला राष्ट्रीय बँकेतून बोलत असल्याच सांगितलं. तसेच काही तांत्रिक कारणांमुळे तुमचं डेबिट कार्ड ब्लॉक होणार असल्याचही सांगितलं. फोन करणाऱ्या व्यक्तीने महिलेला तुमच्या मोबाईलवर जो ओटीपी येईल, तो सांगा मग तुमचं कार्ड ब्लॉक होणार नाही, असं म्हटलं. त्यामुळे तसनीम यांनी ओटीपी आणि काही इतर तपशील सांगितला. तसेच त्यांनी डेबिट कार्डावरील १६ डिजीट क्रमांक, नाव, तीन डिजीटचा सीव्हीव्ही क्रमांकही फोन करणाऱ्या व्यक्तीला सांगितला. त्यानंतर तसनीम यांना २८ वेळा फोन आला आणि त्यांच्या खात्यातून तब्बल ६ लाख ९८ हजार ९७३ रुपये काढण्यात आले. आपण फसवले गेल्याच लक्षात येताच महिलेने पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. तसनीम यांच्या बँक खात्यातून मुंबई, नोएडा, गुरुग्राम, कोलकाता आणि बेंगळुरूत पैशांचे व्यवहार केले गेले आहेत. तसेच चोरट्यांनी तीन वेगवेगळे सिमकार्डचा वापर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



























































