
सामना प्रतिनिधी । मुंबई
बँकेत पैसे भरण्याकरता गेलेल्या महिलेला मदतीचा बहाणा करत तिची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. भामटय़ानी हातचलाखी करून 2 हजार रुपयाच्या 17 नोटा घेऊन पळ काढला. फसवणूक प्रकरणी बांगूर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार या मालाड परिसरात राहतात. त्या मालाडमधील एका खासगी नर्सिंग होममध्ये कामाला आहेत. गेल्या आठवडय़ात त्या कार्यालयातील रक्कम जमा करण्याकरता मालाड येथील एका बँकेत गेल्या होत्या. दुपारी बँकेतील कॅश काउंटरवर महिला पैसे जमा करण्याकरता उभी होती. त्या दरम्यान एक जण महिलेकडे आला. पैसे जमा करण्यासाठी डिपॉझिट स्लीप वर नोटांचे पहिले आणि शेवटचे नंबर लिहणे आवश्यक असल्याच्या भूलथापा मारल्या. तेव्हा महिलेने आपण यापूर्वी कधीही डिपॉझिट स्लीपवर नंबर लिहिले नसल्याचे सांगितले. महिलेने उत्तर दिल्यावर आणखी एक जण तेथे आला. त्याने महिलेला एक स्लीप दाखवली.
आपणदेखील नंबर लिहिले आहेत. आता नियम बदलला असल्याच्या त्याने भूलथापा मारत तिला दुसऱया काउंटरवर नेले. तेथे कोणीच नव्हते. एका जणाने महिलेच्या हातातून स्लीप घेतली. तिच्याकडील नोटांच्या बंडलमधील एका नोटेचा नंबर लिहिला. त्यानंतर दुसऱयाने महिलेकडील नोटांच्या बंडलमधून आणखी एक नोट काढून एकाला दिली. एकाने दोन नोटा आणि स्लीप दिली. महिला पैसे जमा करण्याकरता कॅश काऊंटरला गेली. बंडलमधील नोटा कमी असल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने नोटा मोजून पहिल्या. तेव्हा 2 हजार रुपयांच्या 17 नोटा कमी होत्या. फसवणूक झाल्याप्रकरणी महिलेने बांगूरनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

























































