
50 व्या सीनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या महिला सांघिक गटात मुंबई संघाने बाजी मारली. अंतिम सामन्यात मुंबईच्या महिलांनी ठाणे संघावर 2-1 अशी मात करत जेतेपदावर आपला कब्जा केला.
महिलांच्या सांघिक गटाच्या लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या. पहिल्या एकेरीच्या सामन्यात मुंबईच्या रिंकी कुमारीने ठाण्याच्या मधुरा देवळेवर 25-8, 25-5 असा सहज विजय मिळवून संघाला आघाडी मिळवून दिली. तर दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात ठाण्याच्या समृद्धी घाडीगावकरने मुंबईच्या मिताली पाठकवर 25-5, 25-4 असा विजय मिळवत सामन्यात बरोबरी केली. तिसऱया आणि निर्णायक दुहेरीच्या सामना तिसऱया सेटपर्यंत गेला. तिसऱया सेटच्या सातव्या बोर्डानंतर दोन्ही जोडीचे 17-17 असे समान गुण झाले होते. आठव्या आणि निर्णायक बोर्डाची सुरुवात करण्याची संधी मुंबईच्या आयेशा साजिद खानकडे होती, मात्र ठाण्याने राणी घेतल्यामुळे सामन्यातील चुरस अधिक वाढली. परंतु गमावल्यानंतरही 3 गुणांचा बोर्ड घेत मुंबईने या गटावर आपले वर्चस्व सिद्ध केले. या सामन्यात मुंबईने ठाण्यावर 24-12, 5-18 व 20-17 असा निसटता विजय मिळविला. तिसऱया क्रमांकासाठी पालघर, पुणे आणि रत्नागिरी या तीनही संघांचे प्रत्येकी 2 असे समान गुण झाले होते, परंतु सरासरी गुण कोष्टकाच्या आधारे पालघर संघास विजयी घोषित करण्यात आले.